तुझंवाचून उमगत जाते तुझंवाचून जन्मच अडतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुझंवाचून उमगत जाते
तुझंवाचून जन्मच अडतो...
तुझंवाचून उमगत जाते तुझंवाचून जन्मच अडतो...

तुझंवाचून उमगत जाते तुझंवाचून जन्मच अडतो...

sakal_logo
By

प्रिय सुनंदा,
अत्यंत अपराधी मनाने तुला हे पत्र लिहीत आहे. खरं तर समोरासमोर काही गोष्टी सांगण्याचे धैर्य माझ्या अंगात नसल्याने मी पत्रलेखनाचा पर्याय निवडला आहे.
नवरा म्हणून मी अनेकदा चुकलो आहे, याची मला कल्पना आहे. मात्र, बायको म्हणून तू सगळी कर्तव्य निभावलीस, साध्या मीठ-भाकरीलाही पंचपक्वान समजून, आनंदाने संसार केलास. स्वतःची हौसमौज मारून, अडचणींच्या काळात माझ्या मागे धैर्याने उभी राहिलीस. मुलांना संस्काराची शिदोरी देऊन, त्यांच्यातील स्वाभिमान आणि आत्मविश्‍वास जागवलास. आज आपली मुलगी सुजाता प्राध्यापिका आणि मुलगा संदीप इंजिनिअर आहे, याचे सारे श्रेय तुझेच आहे.
मात्र, आज मागे वळण पाहताना मी तुझ्यावर कळत- नकळतपणे किती अन्याय केला, याची मला जाणीव होते.
सूनबाईसह मुलांना घेऊन संदीप काल नाटकाला गेला होता. आपल्यालाही त्याने बरोबर येण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मी जात नसल्याचे पाहून तूही गेली नाहीस. खरंतर नाटकाची तुला प्रचंड आवड होती. लग्नाआधी तू अनेक नाटके पहायचीस. चांगला अभिनयही करायचीस. मात्र, लग्नानंतर अभिनयच काय पण नाटक पाहणंही तुला कधी जमलं नाही. दर रविवारी तू वर्तमानपत्रातील नाटकांच्या जाहिराती बघायचीस. नाटकाला जाऊ या म्हणून मला सुचवायचीस. पण तुझी आवड- निवड मी कधीच जपली नाही, याची मला खंत आहे. अभिनयाबरोबर तुला गाण्याचीही आवड होती. मात्र, माझ्या आईने ‘असले भिकार नाद येथे चालणार नाहीत’ असं म्हटल्यावर मूकपणाने तू रडत राहिलीस. त्यावेळी मी तुझ्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवे होते. माझी आई जुन्या वळणाची होती. तिची समजूत काढायला हवी होती. पण मी मात्र बघ्याची भूमिका घेतली आणि तुझ्यातील कलाकाराला संपवून टाकले.
सुनंदा, संदीपच्या इंजिनिअरच्या ॲडमिशनसाठी पैसे नव्हते. त्यावेळी आमच्या नकळतपणे तू तुझे दागिने मोडलेस आणि आमच्या हातात पैसे दिलेस. दोन्ही मुलांना उच्चशिक्षण देताना माझा पगार कमी पडू लागला. त्यावेळी तू हातात पोळपाट लाटणे घेऊन, चार-पाच जणांच्या घरी स्वयंपाकाला जाऊ लागलीस. माहेरी अतिशय लाडाकोडात तू वाढली होतीस. मात्र, परिस्थितीमुळे दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्यात तुला कधीही कमीपणा वाटला नाही. तुझ्या कष्टाचे दोन्ही मुलांनी चीज केले, ही गोष्ट खरं असली तरी वडील म्हणून माझे अपयश मला लपवता येत नाही.
संदीप जसा त्याच्या बायको-मुलांना वेळ देतो, त्यांची हौसमौज पूर्ण करतो, तसं मी तुझ्याबाबत एकदाही केलं नाही. तो बायकोचे सगळे हट्ट पूर्ण करतो. मी मात्र तुला काय हवंय- नकोय याची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे मला अपराधी वाटतंय.
गेली पस्तीस वर्षे तू स्वयंपाकघरात राब-राबतेस. आतापर्यंत एकदाही तुला या कामातून सुटी मिळाली नाही. मी मात्र कंपनीतून घरी आल्यानंतर ‘फार दमलोय’ असं म्हणून सोफ्यावर अंग टाकायचो. साप्ताहिक सुटी, रजेच्या काळात आराम करायचो. सेवानिवृत्तीनंतर माझा आणि कामाचा कसला संबंधच आला नाही. मात्र, आजतागायत तू एकदाही सुटी घेतली नाही. घरगुती भांडणात आतापर्यंत मी तुझी बाजू कधी उचलून धरली नाही पण आता इथूनपुढे सगळ्या जगाशी वैर पत्करायला मी एका पायावर तयार आहे.

ता. क. ः उद्यापासून तू फक्त आराम करायचा. सकाळचा पहिला चहा मी तुझ्या हातात आणून देणार आहे. त्यानंतर आपण रोज फिरायला जायचं. दर आठवड्याला तुला चित्रपट किंवा नाटकाला नेणार आहे. त्यावेळी माझ्या हाताने मी तुझ्या केसात गजरा माळणार आहे. तसेच तुझ्यातील कला-गुणांना प्रोत्साहन देणार आहे. लोकांनी कितीही नावं ठेवली तरी आपण दोघांनी असंच आनंदात आणि सुखाने जगायचं. इथूनपुढचा तुझा प्रत्येक क्षण आनंदात घालवणं, ही माझी जबाबदारी असेल. त्यामुळे इथूनमागे मी तुझ्याशी वाईट वागलो, याबद्दल मला माफ कर. करशील ना?
कळावे, तुझा नवरा, सोपानराव