पेट परीक्षेसाठी ७२ टक्के उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेट परीक्षेसाठी ७२ टक्के उपस्थिती
पेट परीक्षेसाठी ७२ टक्के उपस्थिती

पेट परीक्षेसाठी ७२ टक्के उपस्थिती

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली असून, ७२ टक्के उमेदवारांनी परीक्षेत उपस्थिती दर्शवली आहे. नगर, नाशिक, पुणे आणि बारामती शहरातील केंद्रांवर रविवारी दोन सत्रात ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा झाली.
विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठीची ही प्रवेश परीक्षा ३३ केंद्रांवर आयोजित केली होती. रविवारी सकाळच्या सत्रात साडेदहा ते साडेबारा व दुपारच्या सत्रात अडीच ते साडेचार या दोन सत्रांमध्ये परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेसाठी १२ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी नऊ हजार १८२ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. सर्व केंद्रांवर सुरळीतपणे आणि विनाअडचण परीक्षा पार पडल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

मराठीतून प्रश्नपत्रिका नसल्याच्या तक्रारी
पेट परीक्षेच्या आधल्या दिवशी मी प्रश्नपत्रिका मराठीतून उपलब्ध होईल का, असे विद्यापीठाच्या कॉल सेंटरवर विचारले होते. मात्र, प्रत्यक्षात केंद्रावर गेल्यावर मराठीतून प्रश्नपत्रिकेचा पर्यायच मिळाला नाही, अशी तक्रार परीक्षार्थींनी केली आहे. यासंबंधी केंद्र पर्यवेक्षकालाही यासंबंधीची माहिती दिल्याचे ते सांगतात. एका त्रयस्थ खासगी संस्थेमार्फत पेटची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र दोन भाषेतील पर्याय असताना विद्यार्थ्यांना इंग्रजीत परीक्षा द्यावी लागली. यासंबंधी विद्यापीठ प्रशासनाला विचारले असता, त्यांनी केंद्राची योग्य माहिती घेऊन कारवाई करू, असे सांगितले.


‘पेट’बद्दल सर्वकाही...
१) पीएच.डी. प्रवेशाकरिता पेट परीक्षा अनिवार्य आहे का?
- होय.

२) परीक्षेत सूट कोणास मिळते?
- जे विद्यार्थी सेट किंवा नेट परीक्षा संबंधित विषयात पात्र असतील, तर त्यांना पेट परीक्षेतून सूट मिळते. मात्र त्यांना सूट मिळण्यासाठी अर्ज मात्र करावा लागतो.

३) प्रत्येक विद्यापीठाची पेट परीक्षा स्वतंत्र असते का ?
- होय, प्रत्येक विद्यापीठ पीएच.डी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे पेट परीक्षा घेते

४) पेट परीक्षेत किती पेपर असतात ?
- युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘पेट’मध्ये दोन पेपर असतात. अ) संशोधन पद्धतीवर आधारित पेपर, ब) विषयाशी निगडित पेपर

५) पीएच. डी. कशासाठी ?
- युजीसीच्या धोरणानुसार २०२१ पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी सेट-नेट सोबतच पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे.

६) पीएच.डी करिता फेलोशिप आहे का?
- पूर्णवेळ संशोधन कार्य करण्यासाठी पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(जेआरएफ), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप मिळते तसेच बार्टी, सारथी यांसारख्या संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.