मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये 
श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा
मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा

sakal_logo
By

पुणे, ६ ः मंगलाष्टकांचे सूर... ‘राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण’चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करत पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशीविवाह सोहळा पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, संतोष रसाळ, गजानन धावडे, विजय चव्हाण, तानाजी शेजवळ, साखरे महाराज मठाचे वंदना मोडक, वनिता मोडक, सोनिया मोडक आदी उपस्थित होते. श्यामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळ्याचे पौरोहित्य केले. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात मिरवणुकीचा समारोप झाला.

डॉ. सोवनी लिखित पुस्तकांचे प्रकाशन
पुणे, ता. ६ ः डॉ. अविनाश सोवनी लिखित आणि मर्वेन टेक्नॉलॉजीज प्रकाशित ‘मराठा कालखंडातील नगरविकास’, ‘आडबंदरचा रुद्रकोट’ आणि ‘जिर्णोद्धार’ या तीन पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे, लेखक डॉ. सोवनी, मर्वेन टेक्नॉलॉजीचे संचालक मनोज केळकर यावेळी उपस्थित होते. मेहेंदळे यांनी इतिहास संशोधनातील बोलक्या आणि मूक साक्षीदारांचे महत्त्व विविध उदाहरणांसह समजावून सांगितले. ‘मराठा कालखंडाचा वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास झाला पाहिजे. वेगळी वैशिष्ट्ये अभ्यासली पाहिजेत. त्यामुळेच मराठा इतिहासाचे दालन समृद्ध होईल’, असे रावत म्हणाले. ‘मराठा नगररचनाकारांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गावागावांचा विकास केला. मराठा कालखंडात नगर विकास आणि नगर रचना या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या’, असे डॉ. सोवनी यांनी सांगितले.

कीर्तन महोत्सवाचे आयोजन
पुणे, ता. ६ ः ‘कुठल्याही मोठ्या माणसांच्या क्रियेची सिद्धी ही त्यांच्या स्वत्वात असते. कुठल्याही उपकरणावरती त्यांच्या क्रियेची सिद्धी अवलंबून नसते’, असे प्रतिपादन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी नुकतेच केले. आफळे अकादमीतर्फे राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंद स्वामी आफळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित महोत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) उपस्थित होते. महोत्सवात डॉ. अमृता चांदोरकर यांचे ‘निरामय जीवन’ या विषयावरील व्याख्यान आणि मुकुंदबुवा देवरस आणि चारुदत्त आफळे यांची कीर्तने झाली. तसेच, कीर्तन सेवेसाठी मुकुंदबुवा देवरस आणि सामाजिक कार्यासाठी पियुष शहा व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘अगा वैकुंठीच्या राया’ कार्यक्रम
पुणे, ता. ६ ः कार्तिकी एकादशीनिमित्त डॉ. राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांच्या ‘अगा वैकुंठीच्या राया’ या भक्तिसंगीत आणि अभंग गायनाच्या कार्यक्रमाचे नुकतेच सादरीकरण झाले. ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘अमृताहुनी गोड’, ‘देवाचिये द्वारी’, ‘अबीर गुलाल’, ‘पद्मनाभा नारायणा’ आदी अभंगांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. संवादिनीवर साहिल पुंडलिक, तबल्यावर योगेश देशपांडे आणि टाळाची साथ मुकुंद जोशी यांनी दिली. गजानन महाजनी यांनी निवेदन केले.

रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजन
पुणे, ता. ६ ः मराठी रंगभूमी दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे कलाकारांच्या उपस्थितीत नटराज पूजन करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते नटराज पूजन व नाटकाची घंटा वाजवून रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे सह कोषाध्यक्ष शशिकांत कोठावळे, निर्माते अशोक नाईकरे, अरुण गायकवाड, विनोद धोकटे, शिल्पा भवार, माधवी गवंडे, हेमा कोरभरी आदी उपस्थित होते.