मतदार नोंदणी नियमांत सुधारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार नोंदणी नियमांत सुधारणा
मतदार नोंदणी नियमांत सुधारणा

मतदार नोंदणी नियमांत सुधारणा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ : नवमतदारांना आता मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही. कारण भारतीय निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियमात केलेल्या सुधारणांमुळे १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर असे मतदार नोंदणी पात्रता (अर्हता) दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार, तसेच आगाऊ मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करू शकणार आहेत.
देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ येत्या बुधवारी (९ नोव्हेंबर) पुण्यात होणार आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पूर्वी १ जानेवारीनंतर १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर एक वर्ष वाट पाहवी लागत होती. या सुधारणेमुळे एक जानेवारी नंतरही वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर अर्ज केल्यानंतर एक एप्रिल रोजीच्या मतदा यादीत त्यांचे नाव समाविष्ट होणार आहे. एवढेच नव्हे, ज्या दिवशी १८ वय वर्ष पूर्ण होणार आहे, त्या आधी अर्ज केल्यानंतर ही त्या दिवशांच्या नंतर येणाऱ्या तारखेला त्यांच्या नावाचा समावेश मतदार यादीत होणार आहे.’’

जनजागृतीसाठी...
मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी ९ नोव्हेंबरला बालेवाडी येथे सकाळी ६.३० वाजता सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे, असेही श्रीकांत देशपांडे म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता नवमतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजित केले आहे. उद्योग क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा हिंजवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योग-संस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रम होणार आहे. मतदार नोंदणीबाबत सिम्बायोसिस विद्यापीठात १० नोव्हेंबर रोजी संवाद कार्यक्रम होणार आहे.

असा असेल कार्यक्रम
पुनरीक्षण उपक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी नऊ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. दावे व हरकती नऊ नोव्हेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत दोन शनिवार आणि रविवार खास मोहीम राबविण्यात येणार आहे, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. अंतिम मतदारयादी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.