दिवाळी अंक परीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी अंक परीक्षण
दिवाळी अंक परीक्षण

दिवाळी अंक परीक्षण

sakal_logo
By

स्वागत दिवाळी अंकांचे
-------------------

१) वाणिज्य विश्‍व
‘दि पूना मर्चंटस चेंबरचे मुखपत्र असलेला हा दिवाळी अंक आहे. बाजारपेठ, अर्थकारण, कायदा, आरोग्य, ललित साहित्य आदींनी हा अंक समृद्ध झाला आहे.
सुभाष किवडे, ललित गांधी, फत्तेचंद रांका, विजय भंडारी, विनेश मेहता, सूर्यकांत पाठक आदींनी बाजारपेठेतील सद्य परिस्थितीवर लिहिले आहे. अर्थकारण विभागामध्ये विद्याधर अनास्कर, ॲड. गोविंद पटवर्धन, प्रा. नंदकुमार कार्किडे, जयंत मराठे, विनायक कुलकर्णी, सुनील टाकळकर, अमित मोडक आदींनी लिहिले आहे. ॲड. सुकृत देव, मीलन म्हेत्रे, प्रा. सुरेश मेहता, नंदिनी शहासने, सदाशिव गायकवाड यांनी कायदा या विषयावर लिहिले आहे. प्रकाश पै, डॉ. निखिल मोरे, डॉ. अक्षता अग्निहोत्री, डॉ. सुप्रिया मराठे यांनी आरोग्य क्षेत्रावर लिहिले आहे.
संपादक ः प्रवीण चोरबेले, पाने ः ३२४, किंमत ः १०० रुपये
-----------------------------------------------------------------------------
२) सह्याद्रीनंदन
‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ हे संतवचन लक्षात घेऊन, यंदाच्या अंकाची मांडणी केलेली आहे. यंदाच्या अंकात नामवंत कथाकारांनी ग्रामीण शैलीमध्ये केलेले कथालेखन अंकाचे वैशिष्ट्य आहे. पोलिस दलात विशेष उल्लेखनीय तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तपास कथांचा अंकात समावेश आहे. नारायण महाराज, प्रा. अप्पासाहेब खोत, श्यामसुंदर सोन्नर, प्रा. दि. बा. पाटील, प्रा. प्रकाश मोरे, प्रकाश खोंडगे महाराजांनी अंकासाठी लेखन केले आहे. काही नवीन कथाकारांच्या कथांचाही अंकात समावेश केला आहे.
संपादक ः संजय इंगुळकर
मूल्य ः १५० रुपये
पृष्ठे ः १६०
------
३) चंद्रपूर झेप
मनुष्याचा जगण्याचा मूलभूत हेतू पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी जगण्याचा अध्यात्माचा आधार होता. आता केवळ भौतिक सुखाचा शोध घेतला जात आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अतिरेकी अंधानुकरण नवीन पिढी करत आहे. जीवनाबद्दलचा वेध यंदाच्या अंकातून घेतला आहे. कथा, लघुकथा, बालविभाग, कविता, वात्रटिकांनी अंक सजला आहे. जयंत महामिने, अशोक विंचनकर, विजया काळे, विजय कापडी, कॅप्टन राजाराम जगदाळे, श्रीकांत ताम्हनकर आदीच्या कथांचा अंकात समावेश आहे.
संजय घाटे, दादासाहेब सादोळकर, सदानंद बामणे, लक्ष्मीकांत दाभाडकर आदींच्या वात्रटिका आहेत. ज्ञानेश बेलेकर, जयवंत काकडे, अरविंद गाडेकर, सुरेश राऊत, एस. ए. मुलानी आदींची व्यंगचित्रे आहेत.
संपादक ः बबन बांगडे
मूल्य ः १०० रुपये
पृष्ठे ः १७४
-------------------
४) अक्षरदान
यंदाचा अंक जत्रा- यात्रा विशेष आहे. गावोगावच्या जत्रा, आठवणीतील जत्रा, जत्रेचे विविध पैलू, जत्रेच्या कविता, जत्रेच्या आठवणी, जत्रेच्या कथा आदी विभाग या अंकात आहेत. महावीर जोंधळे, इंद्रजित भालेराव यांचे ललित लेखन उत्तम झाले आहेत. डॉ. मिलिंद दामले यांची हिंदी चित्रपटातील तर डॉ. राजेंद्र थोरात यांची मराठी चित्रपटातील जत्रा हे लेख वाचनीय झाले आहेत. अमृता देसर्डा यांची परी, संचिता घोरपडे यांची ख्योळ, प्रियांका पाटील यांची पारी या कथा, तसेच डी. के. शेख यांची लावणी, वि. दा. पिंगळे यांची आयुष्य एक जत्रा, डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांची जत्रेत हरवण्याअगोदर आदींसह अनेक दिग्गज लेखकांचे साहित्य अंकामध्ये आहे.
संपादक - मोतीराम पौळ, मूल्य-२५०, पृष्ठ १९८.
------------------
------------------------
५) भन्नाट
--------------------
या अंकाने विनोद या विषयाला प्राधान्य दिले आहे. राज्याच्या विविध भागातील नामवंत लेखक, कवी तर आहेतच, याखेरीज अनेक लेखक, कवी प्रथमच या दिवाळी अंकासाठी लिहीत आहेत. बबन मोरे यांचे ‘खुर्ची पुराण’, अंजली महाजन यांची ‘पाहुणे आले आमच्याकडे...’, नितीन कुलकर्णी यांची ‘मॉर्निंग वॉक’ या कथा
खुसखुशीत झाल्या आहेत, तर अमोल अंकुलकर, सुनील भातंब्रेकर, प्रमोद रोहणकर, अनिल अभ्यंकर, रत्नाकर वाणी, पद्माकर कळसकर, वसंत बिवरे, सुरेश पोरे यांच्या कथा वाचनीय झाल्या आहेत. विंडबन, चारोळ्या, हास्य कविसंमेलनाची विनोदाची भट्टी जुळून आली आहे. वैजनाथ दुलंगे यांची व्यंग्यचित्रे पाहताना गंमत येते. एकंदरीत सर्वच अंगाने अंक ‘भन्नाट’ झाला आहे.
संपादक ः श्रीराम ठवळीकर, पृष्ठे ः १४४, मूल्य ः १५० रुपये
-----------------------------------------
६) गावगाथा
---------------------
- जागतिकीकरणात अनेक बदल होत असताना गावचे गावपण टिकून आहे, याच पार्श्वभूमीवर यंदा ‘गावगाथा’चा पहिला दिवाळी अंक वाचकांसमोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नव्या पिढीच्या लेखनाचा अंतर्भाव आहे. ‘गावगाथा ओढ गावकडंच्या मातीशी’ ही संकल्पना घेऊन ग्रामीण संस्कृतीची समृद्धी असलेल्या वागदरी गावाबद्दल धोंडप्पा नंदे, प्याटी बावीच्या आविष्काराने नटलेले मैंदर्गीबद्दल नितीन आण्वेकर, रामलिंग चौंडेश्वरी देवीच्या यात्रेबद्दल सय्यद पटेल, कुंभारीच्या गेनसिद्ध यात्रेबद्दल संगीता गाडेकर, जेऊरचे काशीविश्वेश्वर मंदिराबद्दल राजशेखर यांनी माहिती दिली आहे. परमेश्वर माळी यांचे ‘बिनपटाची चौकट’, प्रकाश गायकर यांचे ‘गावचे गावपण टिकले, तर खेडी समृद्ध होतील, यावर ललित लेखन केले आहे, तर अक्कलकोटचे शस्त्रागार, सोलापूर भुईकोट किल्ल्यातील उत्खननात आढळलेल्या रेखीव मूर्तींवर बाबासाहेब निंबाळकर व नितीन आण्वेकर यांनी प्रकाशझोत टाकलेला आहे.
संपादक ः धोडप्पा नंदे, पृष्ठे ः १५२, मूल्य ः १५० रुपये.
------------------------------------
मनशक्ती
------------------------
- मनाच्या सामर्थ्याचा शोध घेणारा अशी ओळख असणाऱ्या मनशक्ती केंद्राचा यंदाचा दिवाळी अंक विविधरंगी विषयांना समर्पित आहे. मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाविषयीचा लेख, तसेच साहित्य रंग कथामाला प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रा. अशोक मोडक, डॉ. सदानंद मोरे आदींसह अन्य विचारवंतांचे लेखन वाचायला मिळते. त्यासोबतच वैज्ञानिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर अनुभवसंपन्न भाष्य करणारा हा अंक वाचनीय झाला आहे.
संपादक ः डॉ. वर्षा तोडमल, पृष्ठे ः १९६, किंमत ः १२० रुपये.