शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेतलेल्या पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक), आठवीच्या (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती) तसेच शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षांचा तात्पुरता निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम यामध्ये दुरुस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये १७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहे.
गुण पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावी लागणार आहे. यासाठी केवळ ऑनलाइन अर्जच करावे. परिषदेने दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच परीक्षा परिषदेने दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या सहायक आयुक्त स्मिता गौड यांनी दिली आहे.