दिवाळीमुळे मिळाली ‘प्रकाशवात’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीमुळे मिळाली ‘प्रकाशवात’
दिवाळीमुळे मिळाली ‘प्रकाशवात’

दिवाळीमुळे मिळाली ‘प्रकाशवात’

sakal_logo
By

अक्षता पवार ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : पोटासाठी चार पैसे कमवायचे असतील तर, रस्त्यावर बसून वस्तूंची विक्री करण्यात कसली लाज... चोरी-चकारी करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच की... माझी आई व आजी घरोघरी जाऊन टाक्या लावायचे काम करत होत्या... रस्त्यावर बसून पाटा- वरवंटा विक्री करण्याचे काम आमच्या कुटुंबात यापूर्वी कधीच कोणी केली नाही. पण, कोरोनात घरातील करत्या-करवीत्या व्यक्तीला गमावल्यानंतर चार पैसे कमविण्यासाठी दगडी जाते व खलबत्ते विकण्याचा पर्याय निवडला. शिक्षण झालेलं नाही बाळा माझं... मग काय काम करणार, म्हणून आईकडून मिळालेल्या पारंपरिक कलेचा आधार घेतला बघ... दिवाळीमध्ये विक्रीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण आजही अशा पारंपारिक दगडी जाते, खलबत्त्यांची खरेदी होत असल्याने आमच्या सारख्यांचे पोट भरत आहे, असं सांगत होत्या सरस्वती किशोर धोत्रे.

वडारवाडी येथील सरस्वती या दोन वर्षांपासून रस्त्यावर दगडी वस्तूंच्या विक्री करत आहेत. या उत्पन्नातून त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनाकाळात नवरा, आई-वडील, भावाचा मृत्यू झाला. त्यामुळे घरात कमविणारे सदस्य नसल्याने घराची जबाबदारी माझ्या अंगावर आली. आता घरी एक मुलगा, वहिनी आणि तिची चार मुलं आहेत. वहिनी घरकाम करते आणि मी रस्त्यावर दगडी जाते व खलबत्त्यांची विक्री करते. दररोज येणाऱ्या उत्पन्नातून थोडं-थोडं बाजूला काढत, पोटाला चिमटे देऊन, काटकसरीने जगत आहोत. मुलांचे शिक्षण आणि अडचणीच्या वेळेसाठी पैसे जोडून ठेवत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत कमी व्यवसाय झाला. गणपती, दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाल्यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता पुन्हा वाढल्याचे दिसते.


गेल्या सात वर्षांपासून ५२ वर्षीय शांता जाधव या रस्त्यांवर घरगुती वापरातील कपड्यांचा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. कोरोनामध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यांचे पती हे जरीचे काम करत होते. पतीच्या मृत्यूनंतर शांता या उत्पन्नासाठी रस्त्यावर कपडे विकतात आणि त्यांची मुलगी शिकवणी वर्ग घेते. रक्तदाब, सांधेवाताची व आरोग्याची इतर समस्या असल्याने घरातील खर्चाबरोबर औषधांचा ही खर्च यातून भागवावा लागतो.
दिवाळी काळातील आपल्या व्यावसायिक उत्पन्नाबाबत त्या म्हणाल्या, ‘‘कोरोना काळात व्यवसाया खूप चांगला झाला. ठराविक वेळेतच घराबाहेर पडण्याची परवानगी असल्यामुळे ग्राहक भाव करण्यात वेळ घालवत नव्हते. त्यामुळे खरेदीला ही प्रतिसाद चांगला होता. मात्र आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविल्याने याचा परिणाम विक्रीवर ही झाला आहे. दिवाळीमध्ये लोकांनी दुकानांमध्ये कपडे खरेदीला प्राधान्य जास्त दिले. त्यामुळे विक्रीतून म्हणावे तितके उत्पन्न नाही झाले. असे असले तरी दररोज तितक्याच उत्साहाने दुकान मांडत व्यवसाय करत आहे.’’

कात्रज येथील ३२ वर्षीय अंबिका राजीव राठोड या तांबडी जोगेश्‍वरी परिसरात १० वर्षांपासून रस्त्यावर टोप्या विक्रीचे काम करतात. त्यांचे पती नोकरी करतात तर, दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. त्यांची दहावी झाली असून अगदी उत्साहाने त्या दररोज रस्त्यावर आपला टोप्या विकण्याचा व्यवसाय करत आहेत. याबाबत त्या म्हणतात, ‘‘दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यात घर खर्च आणि मुलांचे शिक्षण यासाठी दोघांना कमविण्याशिवाय पर्याय नाही.’’
घरातील सगळं काम आवरून दररोज सकाळी रस्त्यावर दुकान मांडायचं आणि रात्री पुन्हा ते गोळा करत घर गाठायचं. असा हा दिनक्रम असून आता या कामाची सवय झाली आहे. सुरवातीला पोस्टर, पुस्तक विक्री करत होते, पण त्याला प्रतिसाद कमी होता. त्यामुळे टोप्या विक्रीला सुरवात केली. दिवाळीत चांगले उत्पन्न मिळाले. हा व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर सुरू केला आहे. त्यामुळे
दररोजचा घर खर्च निघतो आणि कुटुंबासाठी माझाही हातभार लागत असल्याचा मला अभिमान आहे,’’ असे अंबिका यांनी सांगितले.


नारायण पेठेमध्ये राहत असलेल्या आणि बी. कॉम झालेल्या ५० वर्षीय राजेश्री नारायण बोरगे यांना कोरोनाकाळात नोकरी सोडावी लागली. त्यांच्या घरी आई-वडील, दोन भाऊ, भावजय, भावांची मुलं असा परिवार आहे. त्यांनी ३० वर्षे एका खासगी क्षेत्रात नोकरी केली, परंतु कोरोनाकाळात त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे
सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू विकण्यास त्यांनी सुरवात केली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत व्यवसाय चांगला झाला नाही. मात्र दिवाळीत झालेल्या उत्पन्नामुळे त्या आनंदी आहेत.
दुकानांच्या तुलनेत वस्तूंच्या किमती कमी असल्याने बऱ्याच महिला या वस्तू खरेदीला प्राधान्य देतात.
घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर नसली तरी या व्यवसायातून मिळालेले उत्पन्न नक्कीच मी घरात देते. नोकरी नसली तरी या कामातून नक्कीच मन रमते आणि चार पैसे देखील कमवीत आहे, असं राजश्री यांनी सांगितले.