राजकीय संस्कृती चिंतेचा विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय संस्कृती चिंतेचा विषय
राजकीय संस्कृती चिंतेचा विषय

राजकीय संस्कृती चिंतेचा विषय

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः ‘‘राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे. नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि त्यावरील प्रतिक्रिया चिंताजनक आहेत. याबाबत राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करता येईल का, याचा विचार करावा’’, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात ते बोलत होते.
‘अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या विधानासाठी माफीचा आग्रह धरला. सत्तार यांनी माफी देखील मागितली. पण माफी मागितल्यावर, दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यावरील गदारोळ संपायला हवा’, असे पाटील म्हणाले. लोकांना अशा प्रकारची विधाने अजिबात आवडत नाहीत, याचा नेत्यांनी विचार करावा. लोकांना नेत्यांनी विकासावर बोलायला हवे आहे’, असेही त्यांनी सांगितले.
‘हर हर महादेव’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधावरही पाटील यांनी भाष्य केले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणाऱ्यांनी दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये’, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच, मी अजून चित्रपट पाहिला नाही. पाहिल्यानंतरच त्याबाबत अधिक भाष्य करू शकेल. मात्र विरोध करणारे लोक प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावून कसे लावतात? चित्रपटागृहाबाहेर त्यांनी पाट्या घेऊन उभे राहावे. विरोध करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवसेना पहिल्यांदाच फुटली का?
‘‘खोके हा विषय कसा सुरू झाला? ते देखील लोकांना आवडत नाही. शिवसेना यापूर्वी फुटली नव्हती का? नारायण राणे, छगन भुजबळ यांना कोणी फोडले? त्यावेळी खोके नसतील, पेट्या होत्या. आत्ताचे सत्तापरिवर्तन मात्र तसे नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पक्षात घुसमट होत होती, त्यातून ते बाहेर पडले. त्यामुळे हे आरोप बंद व्हायला हवे’’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर ‘शिवसेना शरद पवार यांनी फोडली’, असे तुम्हाला म्हणायचे आहे का, असे विचारले असता ‘समझनेवालों को इशारा काफी आहे. मी टोप्या फेकण्याचेकाम करतो, ज्याच्या डोक्यावर बसेल ते बसेल’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राहुल गांधी यांना प्रोजेक्ट करण्याचा काँग्रेसचा हा तेरावा-चौदावा प्रयोग आहे. मात्र हे करूनही त्यांचे चाळीस-पन्नासहून अधिक खासदार निवडून येत नाहीत, आणि त्यांच्याकडच्या राज्याची संख्या दोनच्या वर जात नाही. पण कोणत्याही पक्षाने हार न मानता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांची ‘भारत जोडो’ ही यात्रा सुरू असतानाही सात पैकी पाच जागा भाजपला मिळाल्या, गुजरात आणि हिमाचलमध्येही आगामी काळात असेच दिसेल.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री