पतसंस्थातील ठेवीदारांनाही संरक्षण मिळण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतसंस्थातील ठेवीदारांनाही संरक्षण मिळण्याची शक्यता
पतसंस्थातील ठेवीदारांनाही संरक्षण मिळण्याची शक्यता

पतसंस्थातील ठेवीदारांनाही संरक्षण मिळण्याची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : सहकारी बँकांप्रमाणेच पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सहकार खात्याकडून मांडला जाणार आहे. तो मान्य झाल्यास ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सहकारी बँकांमधील ठेवीदारांच्या रकमांना पाच लाख रुपयांपर्यंत संरक्षण आहे. त्यानुसार पतसंस्थांमधील ठेवीदारांनाही संरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र आता सहकार विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. सहकार मंत्री सावे यांच्याकडे याबाबतच्या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यासाठी सहकार खात्याकडून वेळ मागण्यात आली आहे. राज्यात २२ हजार (नागरी आणि पगारदार पतसंस्था) पतसंस्था आहेत. त्यामध्ये सुमारे एक लाख दहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्था अडचणीत आल्यास ठेवी धोक्यात येतात. या पार्श्वभूमीवर पतसंस्थांच्या ठेवीदारांची काही ठरावीक रक्कम सुरक्षित राहण्यासाठी सहकार विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) धोरणानुसार खासगी आणि नागरी सहकारी बँकांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण आहे. त्यानुसार राज्यातील पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्याचा सहकार विभागाचा विचार आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर पतसंस्थांच्या ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले,‘‘पतसंस्थांमधील ठेवींना देखील संरक्षण मिळण्याबाबत फेडरेशनच्या वतीने मंगळवारी सहकार मंत्र्यांकडे सादरीकरण केले. संरक्षण तर आम्हाला हवेच आहे, मात्र सहकार खाते अंशदानाचा आग्रह धरत आहे. अंशदान न घेता पतसंस्थांना संरक्षण मिळण्याची मागणी आहे. प्रत्येक संस्थेच्या तरलतेच्या आधारेच संरक्षण देता येऊ शकते. सहकार आयुक्तांसमवेत बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले आहे’’.
दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्र सहकार विकास मंडळामार्फत स्व. दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत ठेवींना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मंडळामध्ये पतसंस्थांनी गुंतवणूक करावी, असा प्रस्ताव पतसंस्थांना देण्यात आला होता. मात्र, त्यास यश आले नाही. आता पुन्हा नव्याने सहकार विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

‘पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण देण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न आहे. पतसंस्थांमधील ठेवींना कशाप्रकारे आणि किती रकमेपर्यंतचे संरक्षण देता येईल, याबाबत विचारविनिमय करण्यात आला आहे. राज्याच्या सहकार मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन सादरीकरण करण्यात येणार आहे. ’
-अनिल कवडे, सहकार आयुक्त