ग्रामपंचायत कामात सुसूत्रतेसाठी जिल्हास्तरीय अभ्यास गट स्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत कामात सुसूत्रतेसाठी जिल्हास्तरीय अभ्यास गट स्थापन
ग्रामपंचायत कामात सुसूत्रतेसाठी जिल्हास्तरीय अभ्यास गट स्थापन

ग्रामपंचायत कामात सुसूत्रतेसाठी जिल्हास्तरीय अभ्यास गट स्थापन

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नऊ सदस्यीय जिल्हास्तरीय अभ्यासगटाची स्थापना केली आहे. हा अभ्यासगट ग्रामपंचायत कामकाजाची सध्याची पद्धती आणि या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी काय बदल अपेक्षित आहेत, याबाबतचा सखोल अभ्यास करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करणार आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी मांजरी (ता. हवेली) येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य राहुल काळभोर यांची नियुक्ती केली आहे.
या अभ्यासगटात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिव्याख्याता, गट विकास अधिकारी, पंचायत विभागातील विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कायदे तज्ज्ञांचा समावेश केला आहे. हा अभ्यासगट ग्रामपंचायतीकडून दिले जाणारे ना हरकत प्रमाणपत्र, गायरान जमीन वापर परवाना, ग्रामपंचायत रेकॉर्डवरील ‘आठ अ’च्या नोंदी या तीन विषयांबाबतचे आतापर्यंतचे सर्व अध्यादेश, सर्व कायदे, परिपत्रके आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर या तीनही विषयावरील कामकाजात नेमकी काय सुधारणा करावी, याबाबत शिफारशी करू शकणार आहे.
या गटाच्या अन्य सदस्यांमध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील अधिव्याख्यात्या सोनाली घुले, जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जुन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शरद माळी, बारामतीचे गट विकास अधिकारी अनिल बागल, मुळशी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (पंचायत) सुनील जाधव, हवेली पंचायत समितीतील ग्राम विकास अधिकारी अनिल कुंभार आदींचा समावेश आहे. याशिवाय, कायदा क्षेत्रातील दोन तज्ज्ञांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार राहुल काळभोर यांना दिला आहे.