वाहतुक कोंडीवरून महापालिकेने पाठविली पीएमआरडीएला नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतुक कोंडीवरून महापालिकेने पाठविली पीएमआरडीएला नोटीस
वाहतुक कोंडीवरून महापालिकेने पाठविली पीएमआरडीएला नोटीस

वाहतुक कोंडीवरून महापालिकेने पाठविली पीएमआरडीएला नोटीस

sakal_logo
By

वाहतूक कोंडीवरून
ढकलाढकली!

महापालिकेकडून आता ‘पीएमआरडीए’ला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ९ : शहरातील वाहतूक कोंडींचे खापर पोलिसांनी बीआरटीवर फोडल्यानंतर, आता महापालिकेने याच कारणासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरणाला (पीएमआरडीए) जबाबदार धरले असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बॅरीकेटींगमुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे कारण पुढे करीत महापालिकेने ‘पीएमआरडीए’ला कारवाई का करू नये, अशी नोटीस बजाविली आहे. एवढेच नव्हे, तर चार दिवसांत या संदर्भात खुलासा करावा, अशी तंबी भरली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपयोजना करण्याऐवजी एकमेकांवर ते ढकलण्याचे काम सुरू असल्याचे यावरून समोर आले आहे.

एकत्रित पाहणी
दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी शहरात एकत्र फिरून विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामे आणि त्या निमित्ताने होत असलेल्या वाहतूक कोंडीची पाहणी केली. या पाहणीनंतर महापालिकेला ‘पीएमआरडीए’कडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान हाती घेण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या बॅरीकेटींग गणेशखिंड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेने पीएमआरडीएला नोटीस पाठवून या संदर्भातील खुलासा मागविला आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय झाला आहे.

पाहणीत काय आढळले?
- कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध सुमारे ८ ते ९ मीटरचा भाग बॅरिकेटिंग करून बंद
- ज्या ठिकाणी काम चालू नाही, मशिनरी नाही, त्या ठिकाणी अशा प्रकारे बॅरिकेटींग केल्याचे निदर्शनास
- त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा

नोटीसमध्ये काय म्हटले आहे?
पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून मागील काही दिवसात विविध प्रचारमाध्यमातून याबाबत पुणे महापालिका तसेच पोलिस यंत्रणेवर टीका होत आहे. तरी ज्या ठिकाणी काम चालू नाही, मशिनरी नाही, त्या ठिकाणी बॅरेकेटींग करून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने आपणावर कारवाई का करू नये, याबाबत लेखी खुलासा चार दिवसात सादर करावा, असे महापालिकेने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात पीएमआरडीएची बाजू समजावून घेण्यासाठी आयुक्त राहुल महिवाल यांच्याशी संपर्क साधला असते ते उपलब्ध होऊ शकले नाही.

अशी आहे स्थिती
१) गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या तीव्र
२) सर्वच स्तरावरून ओरड सुरू
३) पालकमंत्र्यांकडून महापालिका आणि पोलिस आयुक्त यांची स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना
४) पोलिस आयुक्तांकडून महापालिका आयुक्तांना पत्र
५) बीआरटी आणि सायकल ट्रॅकमुळे वाहतुकीची कोंडी होत असून या योजना बंद कराव्यात, असे पत्रात नमूद
६) पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका