‘आयटी’साठीची बनावटगिरी करिअरला लावते ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयटी’साठीची बनावटगिरी
करिअरला लावते ब्रेक
‘आयटी’साठीची बनावटगिरी करिअरला लावते ब्रेक

‘आयटी’साठीची बनावटगिरी करिअरला लावते ब्रेक

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर राजेंद्रने एका खासगी क्लासमधून ‘आयटी’चा कोर्स केला. त्याला एका आयटी कंपनीत नोकरीही मिळाली. मात्र, त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण होते त्याने नोकरीसाठी जोडलेले अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र आणि खोटे बॅंक स्टेटमेंट. कंपनीने नेमून दिलेले पहिलेच काम त्याला करता आले नाही. त्यामुळे त्याची चौकशी झाली अन् त्याचा बनावटपणा उघडा पडला. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. एका चुकीच्या निर्णयामुळे त्याच्या करिअरलाच आता ‘ब्रेक’ लागला.
आयटी क्षेत्राला सध्या मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांचाच ओढा या क्षेत्राकडे वाढत आहे. मात्र नोकरीतील स्पर्धा पाहता काही विद्यार्थी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविण्याच्या शॉर्टकटला बळी पडत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
आयटीतील करिअर संधींबाबत सातत्याने लिखाण करणारे रोहित दलाल सांगतात, ‘‘बनावट कागदपत्रांच्या आधारे आयटी क्षेत्रात नोकरी मिळविण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रलोभनांना बळी पडू नये. कौशल्य वाढविण्यावर भर द्यायला हवा.’’

आमची अडचण समजून घ्या...
आयटी कंपन्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गॅप असल्यास कामावर घेत नसल्याचे एका विद्यार्थ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तो म्हणाला, ‘‘ही चर्चा करताना विद्यार्थ्यांची पण अडचण समजून घ्यायला हवी. काही कारणास्तव गॅप असला तर कंपन्या आम्हाला घेत नाहीत. ज्ञानापेक्षा कागदपत्रांना जास्त लक्ष दिले जाते. त्यामुळे काही विद्यार्थी हा मार्ग निवडतात.’’ तर दूसरा एक विद्यार्थी ही जगण्याची धडपड असल्याची शोकांतिका आहे असे सांगतो.

तज्ज्ञ म्हणतात....
- नोकरीची १०० टक्के हमी देत, बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून देणाऱ्या संस्थांपासून दूर रहा
- आयटी क्षेत्रात ऋची असेल आणि आपल्याला समजत असेल तरच या क्षेत्रात करिअर करा
- कौशल्य आत्मसात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा
- नोकरी मिळविण्यासाठी मुलाखतीचे तंत्र आणि इतर कौशल्यांवर भर द्या
- एखाद्या संस्थेने बनावट अनुभव पत्र दिले, तरी ते नाकारा. स्वतःच्या कौशल्यांवर नोकरी मिळवा

अशी होते चौकशी
१) निवड करताना ः कंपनीच्या मनुष्यबळ विकास (एचआर) विभागाकडून उमेदवाराच्या निवडीपूर्वी त्याची पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) तपासली जाते. यात कागदपत्रे, बायोडाटामध्ये दिलेल्या माहितीची चौकशी केली जाते. उमेदवार पूर्वीच्या ज्या संस्थांची नावे देतात, त्यांच्या एचआर विभागातही अंतर्गत आणि गोपनीय पद्धतीने चौकशी होते. यात काही शंका असल्यास उमेदवाराची मुलाखतच रद्द करण्यात येते.

२) संशय आल्यावरची चौकशी ः एखादे महत्त्वपूर्ण काम (टास्क) करत असताना कर्मचाऱ्याच्या शैक्षणिक माहितीबद्दल शंका असल्यास कंपनी पुन्हा एकदा कसोशीने कर्मचाऱ्याची माहिती घेते. आधीचे नोकरीचे ठिकाणी, तो शिकलेल्या शैक्षणिक संस्थांतील माहितीची गोपनीय चौकशी होती. त्यात कंपनीचा मालकही थेट हस्तक्षेप करू शकत नाही, असे एचआर विभागातील तज्ज्ञ सांगतात. कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष चौकशी आणि मुलाखत घेऊनच पुढील कारवाई करण्यात येते.

कारवाईला कायदेशीर चौकट
उच्च न्यायालयाच्या एका निकालातच बोगस कर्मचाऱ्यांच्या कारवाईची बद्दल स्पष्टता केली आहे. कर्मचाऱ्याचा गुन्हा आणि बनावटगीरीच्या प्रकाराच्या आधारे एक ते दोन वर्षाच्या बंदीपासून ते आयुष्यभराच्या बंदीपर्यंतची तरतूद करण्यात येते. तसेच कंपनी इतर कायदेशीर कारवाईही करू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

बनावट अनुभवपत्र दाखवून नोकरी मिळविण्याची ही अत्यंत वाईट प्रथा आहे. सेवा क्षेत्र हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे निर्यातदार क्षेत्र आहे. असे होत राहिले तर देशाची प्रतिमा खराब होईल. यावर धोरणकर्त्यांनी तातडीने उपाययोजना करायला हवी.
- प्रसाद वाकचौरे, वैज्ञानिक, एमएनसी फार्मा कंपनी, स्वीडन

मी नेहमीच सांगतोय, बनावट अनुभव दाखवू नका. नोकरीचा क्षणिक आनंद काही कामाचा नाही. कौशल्ये विकसित केली तर नोकऱ्या आहेत. नाहीतर बनावटगिरी उघड पडल्यास नोकरी तर जाते, त्याचबरोबर आपले करिअरही संपते.
- रोहित दलाल, संस्थापक, मराठी नोकरी