राज्य हौशी नाट्य स्पर्धा मंगळवारपासून रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य हौशी नाट्य स्पर्धा मंगळवारपासून रंगणार
राज्य हौशी नाट्य स्पर्धा मंगळवारपासून रंगणार

राज्य हौशी नाट्य स्पर्धा मंगळवारपासून रंगणार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीला मंगळवारपासून (ता. १५) प्रारंभ होईल. १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत ही फेरी पार पडेल. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत २२ संघांचे सादरीकरण होणार आहे. मंगळवारी (ता. १५) योगेश पार्क सहकारी गृहरचना संस्थेच्या ‘बावळेवाडी’ या नाटकाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक संस्थेच्या ‘शेवटी जगणं महत्त्वाचं’ या नाटकाने स्पर्धेचा समारोप होईल. सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता प्रत्येकी एका नाटकाचे सादरीकरण होईल. मात्र, २७ नोव्हेंबर रोजी नाट्यगृह उपलब्ध नसल्याने कोणत्याही नाटकाचे सादरीकरण होणार नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० व २०२१ अशी सलग दोन वर्षे राज्य नाट्य स्पर्धा रद्द केली होती. यंदा फेब्रुवारी महिन्यात ६० वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली होती. कोरोनामुळे अनिश्चतेचे मळभ असलेल्या या स्पर्धेत अवघ्या १४ संघांनी भाग घेतला होता. यंदा निर्बंधमुक्त वातावरण असल्याने सहभागी संघांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मागील स्पर्धेत १४ संघ सहभागी असल्याने नियमाप्रमाणे अंतिम फेरीसाठी पुणे केंद्रावरून एकाच संघाची निवड झाली होती. परंतु, यंदा सहभागी झालेल्या संघांपैकी किमान १५ संघांचे सादरीकरण झाल्यास पुणे केंद्रावरून दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.

पुणे केंद्रावर यंदा नवीन संहिता पाहायला मिळत आहेत, तसेच अनेक नवीन संस्था देखील सहभागी झाल्या आहेत. हौशी नाट्यकर्मी राज्य नाट्य स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व समृद्ध नाट्यानुभव घेण्याकरिता रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी.
- राहुल लामखडे,
स्पर्धा समन्वयक, पुणे केंद्र