लस हा मुलाचा जन्मसिद्ध हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लस हा मुलाचा जन्मसिद्ध हक्क
लस हा मुलाचा जन्मसिद्ध हक्क

लस हा मुलाचा जन्मसिद्ध हक्क

sakal_logo
By

पुणे, ता. १० : “मी माझ्या बाळाचं लसीकरण महापालिकेच्या दवाखान्यात केलंय. कारण, नियमित लसीकरण हा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे. पालक साक्षर असो की, निरक्षर, गरीब असो की, श्रीमंत त्यांनी जन्मल्यापासून वेळोवेळी बाळाला लस दिली पाहिजे,” असे मत अमृता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
जागतिक लसीकरण दिन आज साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, “बाळाला होणाऱ्या संभाव्य आजारांपासून संरक्षण कवच देण्यासाठी लस परिणामकारक ठरते, हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. परदेशामध्ये सरकारी यंत्रणेतून लहान मुलांना लस दिली जाते. तशीच लसीकरणाची भक्कम व्यवस्था आपल्या राज्यातही आहे. महापालिकेच्या रुग्णालयात बीसीजी, पेन्टा, व्हिटॅमिन, बूस्टर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लशी बाळाच्या वयोगटानुसार देतात. त्यातूनच माझ्या बाळाचे लसीकरण केले.”

जागृत पुणेकर
लहान मुलांच्या नियमित लसीकरणाबाबत पुणेकर जागृत आहे. बाळ जन्मल्यापासून ते वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत देण्यात येणाऱ्या प्रमुख लशी पुणेकर आपल्या बाळांना देतात. त्यामुळे पुण्यातील नियमित लसीकरणाची सरासरी टक्केवारी ९३ टक्क्यांच्या पुढे असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ही काळजी घ्या...
- बाळाला असलेल्या ॲलर्जीची माहिती डॉक्टरांना द्या
- लस घेतल्यानंतर काही वेळ दवाखान्यात थांबा
- प्रत्येक लशीच्या वेळी डॉक्टरांनी सांगितल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा

लसीकरणाचे महत्त्व
- घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ, रुबेला, काविळ ‘अ’ आणि ‘ब’ अशा प्राणघातक आजारांना रोखण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरते.
- क्षयरोग (बीसीजी), डिप्थेरिया, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी) अशा काही लशी सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात.
- बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने आणखी काही लशींचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पालकांचा खर्च वाढत असला तरीही त्या मुलांसाठी उपयुक्त ठरतात.


पुणे महापालिकेतील लसीकरण (सर्व आकडे टक्क्यांमध्ये)
वर्ष ....................... बीसीजी ....... पेंटा ३ .......... एमआर
२०१८-१९ ............... ९८ .............. ८७ .............. ८६
२०१९-२० ............... ९४ .............. ९२ .............. ९३
२०२०-२१ ............... ९९ .............. ९८ .............. ९७
२०२१-२२ ............... ९५ .............. ९२ .............. ९१

मुलं आजारी पडू नये, यासाठी सर्व पालक कसोशीने प्रयत्न करतात. लसीकरण ही देखिल मुलं आजारी पडू नये, यासाठी केलेली व्यवस्था आहे. लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यातून बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रित करण्यात यश आले असल्याचे दिसते.
- डॉ. रोहित पाटील, बालरोगतज्ज्ञ

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शहरातील प्रत्येक बाळाचे लसीकरण करण्यास पालकांनी प्राधान्य द्यावे. या लसी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे बाळाला लस देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर,
सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका