सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व
सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व

सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व

sakal_logo
By

पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक ठळक व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त प्रा. प्रकाश भोंडे ! शुक्रवारी (ता. ११) ते वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने...
- अरुण नूलकर

पुण्याच्या स्वरानंद प्रतिष्ठानचे सुरवातीच्या काळातले व्यवस्थापक आणि सध्याचे कार्यकारी विश्‍वस्त प्रकाश भोंडे ! गेली ५० वर्षे ही जबाबदारी सांभाळतानाच पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी एक महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. प्रकाश आणि मी बरोबरीचे, म्हणजेच आमच्या मैत्रीचीही ५० वर्षे उलटून गेली आहेत.
प्रकाश हा जुन्या काळातले ख्यातनाम नकलाकार भोंडे यांचा नातू. त्यामुळे तो वारसा काही प्रमाणात त्याच्याकडेही आला आहे. आम्ही बीएमसीसीत असताना प्रकाश नकला करीत असे! आचार्य अत्र्यांची नक्कल तो मित्रमंडळींच्या मेळाव्यात करीत असे! कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाचा चिटणीस म्हणून तो निवडून आला. मला वाटतं तेव्हापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांचं संयोजन हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग बनला. इतका की पुढे बीएमसीसीत प्राध्यापक म्हणून काम करीत असताना विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन. या क्षेत्रातल्या नामवंतांना कॉलेजमध्ये बोलावणे वगैरे उपक्रम प्रकाशच करीत असे. तो त्या अर्थाने बीएमसीसीचा सांस्कृतिक जनसंपर्क अधिकारीच झाला होता.!
‘स्वरानंद’मधली त्याची वाटचाल १९७२-७३ पासून चालू झाली. या संस्थेच्या सर्व कार्यक्रमांचा निर्मितीप्रमुख म्हणून प्रकाश त्याची जबाबदारी पार पाडत आहे. ‘स्वरानंद’ हे प्रतिष्ठान करावं ही संकल्पना त्याचीच! तो आता प्रतिष्ठानचा तहह्यात कार्यकारी विश्‍वस्त आहे. संस्था यशस्वी करताना कुणाला सुनावणी, कुणाला विनवणी, तर कुणाशी मतभेद, तर कुणाशी भांडण (आणि लगेच दुसऱ्या दिवशी पार्टीत दिलजमाई) असं सगळं करावं लागतं. त्यामुळेच एखादा कार्यक्रम सुरू होण्याआधी भोंडे यांची धावपळ, विविध सूचना हे सर्व कलाकारांना परिचयाचं झालंय. प्रकाशच्या संयोजन कार्याचा गौरव म्हणून त्याला गदिमा प्रतिष्ठानचा ‘चैत्रबन’ पुरस्कार, अ. भा. सुगमसंगीत संमेलनात विशेष सत्कार, रोटरीचा ‘व्होकेशनल एक्‍सलन्स’ हा बहुमान, असे सन्मान लाभले आहेत.
प्रकाशचा जनसंपर्क प्रचंड आहे. सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांशी त्याचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. त्यांच्यासमवेतच्या प्रकाशच्या फोटोंचा संग्रह नक्कीच पाहण्यासारखा आहे. अनेकांची अनेक प्रकारची कामं, म्हणजे नवीन कलाकारांना स्टेज मिळवून देणे, मोजक्‍या बजेटात कार्यक्रम आयोजित करणे, कॉलेजात ॲडमिशन मिळवून देणे, नोकरीसाठी शब्द टाकणे या सगळ्यांसाठी एकच नाव प्रकाश भोंडे!
कॉलेजातल्या प्राध्यापकीमुळे दीर्घकाळ तरुणाईचा सहवास, नियमित योगासने, फिरणे यामुळे प्रकाशला ७५ वर्षे पूर्ण झाली असं वाटतच नाही.