वादळ, विजेने यंदा केला घात! शंभर जणांचे बळी; १६० दिवसांमध्ये वादळ, वीज कोसळण्याच्या घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादळ, विजेने यंदा केला घात!
शंभर जणांचे बळी; १६० दिवसांमध्ये वादळ, वीज कोसळण्याच्या घटना
वादळ, विजेने यंदा केला घात! शंभर जणांचे बळी; १६० दिवसांमध्ये वादळ, वीज कोसळण्याच्या घटना

वादळ, विजेने यंदा केला घात! शंभर जणांचे बळी; १६० दिवसांमध्ये वादळ, वीज कोसळण्याच्या घटना

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः निसर्गाच्या अनेक आपत्तींपैकी एक म्हणजेच वीज कोसळणे. देशात विजांच्या कडकडाट मेघगर्जनेसह पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर्षी एक जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशात २७३ पैकी सुमारे १६० दिवसांमध्ये वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकच नाही तर सप्टेंबर महिन्यात या नैसर्गिक आपत्ती उद्‍भवण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्यन्मेंट’च्या (सीएसई) अहवालातून ही स्थिती स्पष्ट झाली आहे.

अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीत वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. ‘सीएसई’च्या अहवालातील आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान सर्वाधिक वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटना या वर्षी जुलैच्या महिन्यात घडल्या. तर राज्यात सुमारे ४५ दिवस या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अशा घटनांचा परिणाम होणाऱ्या पहिल्या दोन राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होता. वादळ आणि वीज कोसळण्यामुळे सर्वाधिक जीवितहानी बिहार राज्यामध्ये झाली होती. बिहारमध्ये एकूण २४३ जणांचा तर राज्यात ९४ लोकांचा मृत्यू या आपत्तीमुळे झाला होता. देशाला उष्णतेच्या लाटेने देखील होरपळून टाकले होते.

एप्रिल ठरला तापदायक
यंदा मार्च ते जुलै दरम्यान ६० हून अधिक दिवस देशात उष्णतेच्या लाटांचा परिणाम जाणवला. उष्णतेच्या लाटेमुळे हा पाच महिने तापदायक ठरले. त्यात सर्वाधिक जास्त उष्णतेच्या लाटा एप्रिल महिन्यात नोंदल्या गेल्या. एप्रिल महिन्यात देशात ३० दिवसांपैकी २३ दिवस उष्णतेच्या लाटेची अनुभूती झाली होती. तर या पाच महिन्यांमध्ये एकूण २४ वेळा उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र होरपळले. परिणामी उष्णतेच्या लाटेमुळे देशातील सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात होते. राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे ३४ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

हे ही जाणून घ्या
वीज कोसळण्यामागील शास्त्रीय कारण पाहता, ढगांमध्ये दोन प्रकारचे ‘चार्ज’ असतात (+ आणि -). आकाशात उंचावर जेव्हा हे ढग एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यात असलेले हे ‘चार्ज’ विजेची निर्मिती करतात. त्यामुळे विजांच्या कडकडाट पाहायला मिळते. असे असले तरी वीज कधी आणि कोठे कोसळणार याबाबत अंदाज लावणे शक्य नसल्यामुळे याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात.

या राज्यांमध्ये सर्वाधिक परिणाम
राज्य ः वादळ/वीज कोसळण्याच्या घटनांचे दिवस ः मृत्यू
मध्य प्रदेश ः ४६ ः १६४
महाराष्ट्र ः ४२ ः ९४
गुजरात ः २६ ः ५२
बिहार ः २३ ः २४३
उत्तरप्रदेश ः २२ ः १०७

महिन्यानुसार वादळ/वीज कोसळण्याच्या घटना
महिना ः आपत्तीच्या घटनांचे दिवस
जानेवारी ः ७
फेब्रुवारी ः ५
मार्च ः ४
एप्रिल ः १९
मे ः १९
जून ः २३
जुलै ः ३१
ऑगस्ट ः २२
सप्टेंबर ः २८

उष्णतेच्या लाटांची स्थिती
महिना ः उष्णतेची लाट उद्‍भवलेले दिवस
मार्च ः १७
एप्रिल ः २३
मे ः ११
जून ः १४
जुलै ः १