कागदपत्र पडताळणीकडे अभियंत्यांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागदपत्र पडताळणीकडे अभियंत्यांची पाठ
कागदपत्र पडताळणीकडे अभियंत्यांची पाठ

कागदपत्र पडताळणीकडे अभियंत्यांची पाठ

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेत आॅनलाइन परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आले. मात्र, यातही अनुपस्थित राहण्याचे प्रमाण मोठे आहे. ४६० जणांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलविले असता त्यापैकी ११९ जण उपस्थित राहिले नाहीत. अपूर्ण कागदपत्र आणि इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता यामुळे उमेदवार उपस्थित राहिले नसल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

महापालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विधी अधिकारी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि लिपिक या पदांसाठी ४४८ जागांची भरती प्रक्रीया सुरू आहे. यासाठीची आॅनलाइन परिक्षा इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेच्या माध्यमातून घेतली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी ८६ हजार ९९४ अर्ज आले होते. मात्र, त्यापैकी ६७ हजार २५४ उमेदवारांनी परीक्षा दिली. आत्तापर्यंत लिपिक पद वगळता इतर सर्व पदांचा निकाल जाहीर झाला आहे.
कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या १३५ जागा आहे. या पदासाठी १२ हजार ७०४ जणांनी परीक्षा दिली होती. एका जागेसाठी एकास तीन या प्रमाणे ४६० उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले होते. मात्र, पहिल्या यादीतील १९ आणि दुसऱ्या यादीतील १०० उमेदवारांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरवली.

इतर उमेदवारांना संधी मिळणार का ?
महापालिकेने गुणवत्ता यादीतील पहिल्या ४६० जणांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले होते. पण, त्यातील ११९ जण उपस्थितच नसल्याने १३५ पदांसाठी केवळ ३४१ जणांचीच कागदपत्र पडताळणी होऊ शकली आहे. त्यातही अनेकांनी बनावट अनुभवपत्र जोडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या पदासाठी पुरेशा प्रमाणात स्पर्धा होत नसल्याने ४६० शिवाय हे उर्वरित प्रतिक्षा यादीतील उमेदवार आहेत, त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावणार का?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान याचा निर्णय निवड समिती घेणार आहे.

कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी ४६० जणांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले होते. त्यापैकी ११९ उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. यामागे कागदपत्र अपुरे असल्याने किंवा इतर ठिकाणी नोकरी करत असल्याने उमेदवार आले नसावेत अशी शक्यता आहे. हे उमेदवार अनुपस्थित राहिल्याने इतर उमेदवारांना संधी मिळणार का?, याचा निर्णय निवड समिती घेईल.
- सचिन इथापे,
उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग