पुण्यात किमान तापमानाचा पारा स्थिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात किमान तापमानाचा पारा स्थिर
पुण्यात किमान तापमानाचा पारा स्थिर

पुण्यात किमान तापमानाचा पारा स्थिर

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या घरात स्थिर आहे. त्यामुळे रात्री व पहाटेच्या गारठ्यातही वाढ झाली आहे. एकीकडे शहरात भल्या पहाटे धुके व दव पडत असल्याचे चित्र तर दुसरीकडे रात्रीच्यावेळी थंडीपासून सुटका व्हावी यासाठी शेकोट्या पेटत आहेत. दरम्यान, पुढील पाच ते सहा दिवस तापमानात किंचित चढ-उतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
पावसाचा हंगाम संपताच किमान तापमानात ही कमालीची घट होण्यास सुरवात झाली. शहरात शुक्रवारी देखील किमान तापमानाचा पारा १२.८ अंशांवर स्थिर होता. सरासरीच्या तुलनेत सुमारे तीन अंशांची घट कायम होती. तसेच राज्यातील नीचांकी तापमान सलग दुसऱ्यांदा पुण्यात नोंदले गेले होते. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक कमी किमान तापमान ठरले. तर कमाल तापमानात ही सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली होती. सध्या दिवसा उन्हाच्या चटक्यानंतर रात्री थंडीची अनुभूती नागरिकांना होत आहे. तर किमान तापमानातील चढ-उतार कायम राहू शकतो असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.
राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानात किंचित घट झाली. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरवात झाली; मात्र अद्याप राज्यात किमान तापमान १० अंशांखाली नोंद झालेली नाही. तर पुढील पाच दिवस राज्यातील किमान तापमानात कोणत्याही प्रकारची घट अपेक्षित नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीसाठी तुर्तास वाट पहावी लागणार आहे.
नैॡत्य बंगालच्या उपसागरात ईशान्य श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत शुक्रवारी (ता. ११) ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. ही प्रणाली वायव्यच्या दिशेने सरकत रविवारपर्यंत (ता. १३) केरळ अरबी समुद्राकडे जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता आग्नेय बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. १६) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते.