किमान तापमानात चढ-उतार सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमान तापमानात चढ-उतार सुरूच
किमान तापमानात चढ-उतार सुरूच

किमान तापमानात चढ-उतार सुरूच

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसात गारठा वाढला. त्यात किमान तापमानात होत असलेली चढ-उतार कायम आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून १२ अंशांच्या घरात स्थिर असलेल्या तापमानात किंचित वाढ झाली असून शनिवारी (ता. १२) शहरात १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. असे असले तरी सलग तिसऱ्या दिवशीही हे राज्यातील नीचांकी तापमान होते. तर शहरात पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानातील वाढ आणि घट कायम राहू शकते, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
शहरातील किमान व कमाल तापमानात तफावत असून पहाटेच्या वेळी धुके व गारठा जाणवत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटकेही सोसावे लागत आहेत. दरम्यान, शहरात सोमवारी (ता. १४) आणि बुधवारी (ता. १६) संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात किमान तापमान १३ ते २० अंशांच्या जवळपास राहू शकते.
राज्यात गारठा जाणवू लागला असला तरी अद्याप थंडीचा कडाका वाढलेला नाही. मात्र पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका ही स्थिती कायम आहे. सध्या राज्यात किमान तापमान १३ ते २४ अंशांदरम्यान नोंदले जात असून कमाल व किमान तापमानात चांगलीच तफावत आहे.
दरम्यान ऐन हिवाळ्यात पुढील दोन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडू आणि पदुच्चेरीच्या किनाऱ्यावर येताच त्याची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान ही प्रणाली तमिळनाडू, केरळकडे सरकत आहे. तर सोमवारी (ता.१४) ही प्रणाली अरबी समुद्राकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्याच पाठोपाठ आता आग्नेय बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. १६) एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.