
जगाचे नेतृत्त्व करण्याची देशाची क्षमता आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चाचण्या दिन; सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध
पुणे, ता. १९ : कोरोना उद्रेकात देशात वैद्यकीय चाचण्यांचे प्रमाण वाढले. मात्र, देशाची क्षमता पाहता वैद्यकीय चाचण्या आखणी वाढण्याची गरज आहे. जागतिक दर्जाची रुग्णालये, प्रशिक्षित डॉक्टर, शल्यचिकित्सक आणि अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने भारत औषध निर्माण क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकतो, असा विश्वास विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला.
दरवर्षी २० मे हा आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चाचण्या दिन म्हणून साजरा केला जातो. जेम्स लिंड यांनी १७४७ मध्ये याच दिवशी पहिली वैद्यकीय चाचणी सुरू केली. यामुळे जगभरात आधुनिक वैद्यकीय चाचण्यांचा पाया घातला गेला.
सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या रिसर्च व अॅकेडेमिक्स विभागाच्या संचालक डॉ. दीपा दिवेकर म्हणाल्या, ‘‘संशोधन आणि वैद्यकीय चाचण्यांचा प्रभाव हा कोरोनासारख्या विषाणूजन्य संसर्गांपुरता मर्यादित नाही तर अॅलर्जी आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांसाठी देखील आहे.’’
हॉस्पिटल्सच्या रिसर्च एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र घुई म्हणाले, ‘‘संशोधन हा नवीन औषध, लस तसेच उपकरणे तयार करण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. अनेक वर्षे हे संशोधन सुरू असते. त्यातून नवीन औषध, लस निर्माण होते.’’ जगभरात कोरोना उद्रेकामध्ये सर्व आघाड्यांवर जागतिक स्तरावर आमूलाग्र बदल दिसून आला. ‘आरटी-पीसीआर’, ‘अँटिजेन टेस्ट’, प्रयोगशाळेतील चाचण्या, सीटीस्कॅन, रक्तातील प्लाझ्मा, ऑक्सिजन हे सगळे शब्द आपल्या कानावर पडले. या प्रत्येकात झपाट्याने बस झाला यामागे वैद्यकीय चाचण्यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
डॉ. घुई म्हणाले, ‘‘वैद्यकीय चाचण्या हा औषधे विकसित करण्याच्या प्रक्रियेतील खर्चिक भाग असतो. यात औषध किंवा लशीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता दर्शविण्यासाठी रुग्णांना दिले जाते. ही औषधे भारताबाहेर विकसित केली जातात किंवा वैद्यकीय चाचण्या केल्या जातात तेव्हा त्याचा खर्च दुप्पट किंवा तिप्पट असतो. त्यामुळे देशात अत्यंत कमी किमतीत एखादे औषध विकसित केले जाऊ शकते.’’
वैद्यकीय चाचण्या ही आजच्या काळाची गरज आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, हिमोफिलिया, दमा, अस्थमा, स्मृतिभ्रंश, अपस्मार आणि इतर अनेक आजारांनी ग्रस्त रुग्णांना वैद्यकीय चाचण्या नवी आशा देतात. या चाचण्यांमधून मानवाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन, सुरक्षित अधिक प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्याचा भविष्यातील सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे.
- डॉ. दीपा दिवेकर
दोन टक्के चाचण्या देशात
- जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा १६ टक्के आहे. मात्र, जगातील केवळ दोन टक्के वैद्यकीय चाचण्या देशात होतात.
- वैद्यकीय चाचण्यांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होतो. भारतीयांनी माहिती तंत्रज्ञानामध्ये आपली क्षमता आणि वर्चस्व दाखविले आहे. त्यामुळे औषधविकासामध्येदेखील आपण जगाचे नेतृत्व करू शकतो.