दिवाळी अंक परीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी अंक परीक्षण
दिवाळी अंक परीक्षण

दिवाळी अंक परीक्षण

sakal_logo
By

थिंक पॉझिटिव्ह
समाजातील नाकारलेपण बाजूला सारून कायम सकारात्मक बाजू मांडणाऱ्या थिंक पॉझिटिव्हचा यंदाचा अंकही ‘भावलेल्या प्रसंगां’वर आधारलेला आहे. उद्याचे जग आजच्यापेक्षा अधिक सुंदर करण्याचा वारंवार होत असलेला उपक्रम स्तृत्य आहे. अलका कुबल, शर्वरी जमेनीस, दीपक पारखी, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, कुमार सप्तर्षी, डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्यासह विविध मान्यवरांनी ‘मला भावलेल्या गोष्टी’तून सांगितलेले अनुभव वाचनीय आणि विचार करायला भाग पाडतात. मानवी भावभावनांचे विविध पैलुंची माहिती प्रत्येकाच्याच समृद्ध अनुभवातून वाचकांच्यासमोर मांडली आहे. ‘मला भावलेली गोष्ट’ ही चांगुलपणामागील श्रद्धेच्या प्रसारासाठी घातलेली फुंकर आहे.
संपादक ः यमाजी मालकर, मूल्य ः २०० रुपये, पृष्ठे ः १४२
----
शब्ददर्वळ
इंदूर येथून प्रकाशित होणाऱ्या अंकात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अनंत महादेवन, शंकर महादेवन, उषा नाडकर्णी, नागराज मंजुळे यांच्या मुलाखती वाचनीय आहेत. त्याचबरोबर लीना मेहेंदळे, प्रा. अनिल गोरे, डॉ. किरण चित्रे, प्रा. अशोक कोल्हे, आनंद अवधानी, डॉ. सुषमा पौडवाल आदींचे लेख माहितीपूर्ण आहेत. सु. ल. खुटवड, डॉ. निर्मोही फडके, प्रा. अरुंधती पाटील, दीपाली ठाकूर आदींच्या कथा हे अंकाचे वैशिष्ठ्ये आहे. भारती बिर्जे, अंजली लिमये, राजेंद्र अत्रे, निशा काळे, डॉ. सविता शेट्टी, डॉ. स्नेहल कुलकर्णी आदींच्या कवितांनी अंक सजला आहे.
संपादक ः श्रीकृष्ण बेडेकर, मूल्य ः ४०० रुपये, पृष्ठे ः १३६
फोटो ः 04900
-------
विचारभारती
यंदाच्या अंकात ‘ओळख’ शब्दाचे पदर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. माझं ‘मी’ पण कसं निर्माण होतं, याविषयी आपण विकासात्मक मानसशास्त्रात वाचत असतो. मात्र, त्यासंदर्भात प्राचीन भारतीय विचार काय होता, हे या अंकात आपल्याला वाचता येईल. या अंकामध्ये ‘पंचकोश आणि स्व जाणीव : एक अन्योन्य संबंध’, ‘नावात काय आहे?’, वेगळी ओळख समजून घेणारी बागेश्री, लग्नानंतर ओळख जपताना, भारतीय स्त्रीची ओळख आदी विषयांवर लेख आहेत. त्याच बरोबर अनय, कृष्णमाया, अंतरीची पंढरी, घार, आत्मभान, विठ्ठल, तुझ्या कारणे आदींसह अन्य कवितांचा अंतर्भाव अंकात आहे. विचारांची लखलखती पणती असणारा विचारभारती अंक म्हणजे एक प्रकारे वैचारिक फराळच आहे.
संपादक ः विभावरी बिडवे, मूल्य ः १७५ रुपये, पृष्ठे ः १३६
-------
ईर्जिक
यंदाचा दिवाळी अंक खुमासदार झाला आहे. या अंकात आर्थिक साक्षरतेच्या दमदार पाऊलखुणा, आकाशाचे खांब, ‘जॉन लॉ’चा लोच्या, सोशल मीडियाची उत्क्रांती, वेगे वेगे धावू..., चालीरिती, परंपरा अन् त्यातील विज्ञान, आयपीओचा आपटबार आदी विषयांचे लेख आहेत. नावात हाय्यचं काय?, पाण्यातनं धुमासलेली आग या विषयावरील लेख या अंकामध्ये आहेत. विविध विषय नावीन्यपूर्ण शैलीत हाताळले आहेत. ‘आंतरराष्ट्रीय कला उत्सव : सेरेंडिपिटी’ या लेखामध्ये अल्पावधीतच गोव्यामध्ये लोकप्रिय झालेल्या सेरेंडिपिटी या महोत्सवाची माहिती दिलेली आहे.
प्रकाशक ः स्वाती अ. लांडकर, मूल्य ः २०० रुपये, पृष्ठे ः १०८
---------
आरोग्यदीप
सुखी दीर्घायुष्याचा कानमंत्र देणारा यंदाचा अंक आहे. या अंकात जीवनशैली व आरोग्य या सदरात डॉ. संप्रसाद विनोद यांचा ‘सर्वांगीण आरोग्यासाठी आत्मयोग’, डॉ. दिलीप देवधर यांचा ‘बदलती जीवनशैली’, डॉ. आनंद कळसकर यांचा ‘खरचं आपलं काही चुकतयं का?’, डॉ. वैजयंती लागू-जोशी यांचा ‘पुरे झाली औषधे’, डॉ. अपूर्वा संगोराम यांचा ‘जगण्याचा आनंद’ लेख आहेत. तसेच ‘जीवनाचे आधारस्तंभ ः आहार’, निद्रा, ब्रम्हचर्य, एक स्वस्थ मुलाखत, पंचकर्मोपचार, आजारांशी लढाई, आरोग्याशी हातमिळवणी, माता-बाल-युवक आरोग्य, अन्य व पूरक उपचार पद्धती या सदरांतील लेखांद्वारे आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. राशीनुसार आरोग्य स्थिती हे यंदाच्या अंकाचे वैशिष्ठ्य आहे.
संपादक- डॉ. दिलीप पुराणिक, मूल्य ः १४०, पृष्ठे ः १२८
--------------
चांगुलपणाची चळवळ
यंदाचा दिवाळी अंक कैद्यांच्या जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी वाहिलेला आहे. तुरुंग व्यवस्थापन, कैद्यांचे अधिकार, त्यांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर या क्षेत्रातल्या विशेषज्ञांचे लेख अंकात आहेत. महाराष्ट्रातील कारागृहे बनली सुधारगृहे- डॉ. भूषण कुमार उपाध्याय, तुरुंगाच्या भिंती- फिलीप भीमराव शिरसाठ, सबब- नरेश चरणसिंग राठोड, जीवनाचा अर्थ- प्रकाश तुळशीराम पंडित, नवी आशा- समीर लांडगे, बंदीजनांसाठी विविध कल्याणकारी योजना- डॉ. विठ्ठल जाधव, कैद्यातला ‘माणूस’ जागवताना- स्वाती साठे, ‘गजाआड’ अण्णा भाऊ, कैदी नं. ११३- विश्‍वास पाटील, अंदमानच्या छळछावणीचं झालं तार्थक्षेत्र- मंजिरी मराठे कहाणी ‘कर्मयोग्या’च्या कारावासाची! - पार्थ बावस्कर आदी लेख आहेत. त्याचबरोबर डॉ. मीरा बोरवणकर यांची विशेष मुलाखतही अंकात आहे.
संपादक ः शुभांगी नितीन मुळे, मूल्य ः २०० रुपये, पृष्ठे ः १६०
-----
ग्रहवेध
तीन दशकांत भारतातील नामवंत ज्योतिर्विदांचे अभ्यासपूर्ण लेख यंदाच्या अंकात प्रकाशित झाले आहेत. यावर्षीच्या अंकात ज्येष्ठ साहित्यिक वामन देशपांडे, महेश वाघोलीकर, मधुसुदन घाणेकर, चित्तरंजन कुलकर्णी, सुवर्णा सुत्रावे, सुजीत चक्रवर्ती, अभय जोशी यांचे लेख माहितीपूर्ण आहेत. सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. त्याच बरोबर अरुण जोशी यांनी ग्रहगणिताच्या दृष्टिकोनातून वेगळी मांडणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेचा आढावाही अंकात घेतला आहे.
संपादक ः डॉ. उदय मुळगुंद, मूल्य ः २०० रुपये, पृष्ठे ः १५६
-------
ज्योतिष ज्ञान
भविष्य या विषयी सर्वांमध्येच उत्सुकता असते. याबाबत सविस्तर भाष्य यंदाच्या अंकात करण्यात आले आहे. राशिभविष्याबरोबरच देश आणि महाराष्ट्राची पत्रिका काय सांगते याची माहिती अंकात दिलेली आहे. महत्त्वाच्या राजकीय व्यक्तिंच्या पत्रिकांचा आढावा घेतला आहे. भविष्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने असलेल्या विषयावर मान्यवरांच्या लेखांचा अंकात समावेश आहे. यामध्ये वा. ल. मंजूळ, कुमुकमा नेऊरकर, मृणालिनी ठकार, मनिषा शिंदे आदी विविध मान्यवरांनी लेखन केले आहे.
संपादक ः सिद्धेश्वर मारटकर, मूल्य ः २५० रुपये, पृष्ठे ः २५६