जितेंद्र आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे ः पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जितेंद्र आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे ः पवार
जितेंद्र आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे ः पवार

जितेंद्र आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे ः पवार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या प्रकारामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे, तो व्हिडिओ मी पाहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही घटना घडली असल्याने त्यांनी स्वतः पुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी. तसेच आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राजकारणात चढ-उतार घडतच असतात. त्यामुळे लोकशाही मार्गाने त्याविरोधात संघर्ष केला पाहिजे. मुंबईत जाऊन मी आव्हाड यांची भेट घेऊन राजीनाम्याचा विचार न करण्याची विनंती करणार आहे. ज्या घटनेमुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचा व्हिडिओ मी पाहिला, त्यात मुख्यमंत्रीही दिसत आहेत. ज्येष्ठ नेते गाडीत बसत असताना तेथे आव्हाड उभे होते, तिथल्या गर्दीत आव्हाड यांनी एका भगिनीला बाजूला जायला सांगितले. या पेक्षा वेगळे काहीही घडलेले नाही. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अपमानजनक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गुन्हा मागे घ्यावा.’’
राज्यातील मोठमोठे प्रकल्प परराज्यात जात आहेत. पण त्याचे खापर अजूनही आमच्या महाविकास आघाडी सरकारवरच फोडले जात आहे. अजून किती दिवस मागील सरकारवरच खापर फोडणार, अशी टीका पवार यांनी केली.

आव्हाडांनी वाचवले, तरीही जेलमध्ये ठेवले
ठाण्यामध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडताना मारहाण झालेल्या व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांनीच वाचवले असा तो व्यक्ती सांगत आहे. पण पोलिसांनी आव्हाड यांना अटक करून रात्रभर जेलमध्ये ठेवले. कायद्याचा आदर केला पाहिजे, त्याबाबत दुमत नाही. पण, कारवाई ही कायद्यानुसार झाली पाहिजे, असे पवार म्हणाले.

आव्हाडांचे चुकलेले नाही ः सुळे
जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला, त्यांच्यावर ज्याआधारे गुन्हा दाखल झाला, तो व्हिडिओ मी तीन-चार वेळा पाहिला. त्यात आव्हाड यांनी काहीच चुकीचे केलेले नाही, वाईट वाटून घेऊन राजीनामा देऊ नये. सत्यमेव जयते ही भूमिका घेऊन लढत राहावे, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केली. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही समोरच होते. विनयभंग झालेला नाही, तरीही असा गुन्हा दाखल करणे, हा सर्व महिलांचा अपमान आहे, राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का? अशी टीकाही त्यांनी केली.