चुका काय फक्त नेहरूंनीच केल्या का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुका काय फक्त नेहरूंनीच केल्या का?
चुका काय फक्त नेहरूंनीच केल्या का?

चुका काय फक्त नेहरूंनीच केल्या का?

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः नेहरू हे आता इतिहास आहेत. अपुरी माहिती, चुकीची माहिती व खोट्या माहितीच्या आधारे इतिहासाला डागाळण्याचे काम केले जाते. नेहरू यांनी चुका केल्याच नाहीत, असे मी म्हणणार नाही. पण जो माणूस पुढाकार घेऊन काही काम करतो, त्याच्याच हातून चुका होतात. सगळ्याच पंतप्रधानांकडून त्या होतात. त्यामुळे चुका काय फक्त नेहरूंनीच केल्या का?, असा सवाल करत केवळ त्यांच्याच चुकांची यादी करण्याचे कारण नाही, असे परखड मत निवृत्त न्यायमूर्ती व नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था यांच्यातर्फे आयोजित ‘नेहरू विचार मंथन’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ॲड. राज कुलकर्णी, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, गोखले संस्थेचे कुलगुरू अजित रानडे आदी उपस्थित होते.

चपळगावकर म्हणाले, ‘‘शेख अब्दुला नेहरू यांचे इतके लाडके का? असे अनेक लोक विचारतात. पण फाळणीच्या वेळी संस्थानाच्या राजांच्या नव्हे तर लोकांच्या इच्छेप्रमाणे निर्णय व्हायला हवा, अशी भारताची भूमिका होती. जुनागढ आणि हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण त्याप्रमाणे झाले. म्हणूनच काश्मीरच्या राजाने सामीलनामा लिहून दिल्यानंतरही काश्मीरची जनता आपल्याला अनुकूल आहे, हे दाखवण्यासाठी तेथील शेख अब्दुला यांच्यासारख्या मुस्लीम जनतेच्या प्रतिनिधींना नेहरू यांनी प्रकाशझोतात आणले. पण भारताविरुद्ध गरळ ओकल्यानंतर नेहरूंनी त्यांना अटक करण्याचेही निर्देश दिले.’’ डॉ. विजय केळकर, अजित रानडे यांनीही मनोगत व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्य स्वाती राजे यांनी सूत्रसंचालन केले.

‘नेहरूंमुळेच लोकशाही टिकली’
‘‘जगात आज भारताची ओळख नेहरू-गांधीचा देश अशी आहे. पं. नेहरूंनी हा देश घडविला. प्रत्येक भारतीयांच्या मनात नेहरू आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर आशियाई उपखंडातील भारतासह अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यातील केवळ भारतातच आज लोकशाही टिकून आहे. याचे कारण नेहरूंनी केलेल्या मजबूत पायाभरणीत आहे’’, असे ॲड. राज कुलकर्णी यांनी सांगितले.