ग्रीन कॅरीडोअरची प्राथमिक आखणी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रीन कॅरीडोअरची प्राथमिक आखणी पूर्ण
ग्रीन कॅरीडोअरची प्राथमिक आखणी पूर्ण

ग्रीन कॅरीडोअरची प्राथमिक आखणी पूर्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १५ : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) हाती घेतलेल्या पुणे-बंगळूर ग्रीन कॅरीडोअरची प्राथमिक आखणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार पुणे-बंगळूरमधील अंतर १०० किलोमीटरने कमी होणार आहे. तर प्रवासाच्या वेळेत सुमारे दोन तासांनी बचत होणार आहे.
केंद्र सरकारने भारतमाला प्रकल्पतंर्गत पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बंगळूर या दोन ग्रीन कॅरीडोअर प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पुणे-औरंगाबाद ग्रीन कॅरीडोअरसाठी सल्लागार नेमण्यात आला असून त्यांच्याकडून प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू देखील झाले आहे. त्यापाठोपाठ पुणे-बंगळूर ग्रीन कॅरीडोअरसाठी देखील सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या सल्लागार कंपनीकडून प्राथमिक मार्गाची आखणी पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच त्यास मान्यता देऊन डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे-बंगळूर हे अंतर सुमारे ८५० किलोमीटर आहे. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन कॅरीडोअरमुळे हे अंतर शंभर किलोमीटरने कमी होऊन ७५० किलोमीटर होणार आहे. सध्या प्रवासासाठी दहा ते बारा तास लागतात. नव्या मार्गामुळे वेळेतही बचत होणार असून आठ ते नऊ तासांमध्ये बंगळूरला जाणे शक्य होणार आहे. हा ग्रीन कॅरीडोअर शंभर मीटर रुंदीचा आणि सहा पदरी असणार आहे. त्यावर बैलगाडी, मोटार सायकल यासारख्या वाहनांना पूर्ण बंदी राहणार आहे. तशी ८० ते १०० किलोमीटरचा वेग असणार आहे. दोन ते तीन महिन्यांत डीपीआरचे काम पूर्ण करण्याचे बंधन सल्लागार कंपनीला घालण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-बंगळूर मार्गापेक्षा हा मार्ग पूर्णतः वेगळा असणार आहे. प्राथमिक मार्गाची आखणी पूर्ण झाली असून सध्या ग्राउंडवरील सर्व्हेक्षण आणि डेटा गोळा करण्याचा काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक निश्‍चित करण्यात आलेल्या मार्गात काही प्रमाणावर बदल करावा लागणार आहे की नाही, हे कळेल. परंतु जवळपास ९० टक्के मार्ग तोच राहील, असे चित्र सध्या तरी आहे, असेही ते म्हणाले.