बालमधुमेहाविषयी साक्षरता गरजेची ः डॉ. नांदेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालमधुमेहाविषयी साक्षरता गरजेची ः डॉ. नांदेडकर
बालमधुमेहाविषयी साक्षरता गरजेची ः डॉ. नांदेडकर

बालमधुमेहाविषयी साक्षरता गरजेची ः डॉ. नांदेडकर

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः ‘‘टाइप वन डायबेटिस असलेल्या मुलांना अर्थात बालमधुमेहींना सशक्त सामाजिक वातावरण निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाने बालमधुमेहाविषयी साक्षर आणि संवेदनशील होण्याची गरज आहे,’’ असे मत अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी व्यक्त केले.

जागतिक मधुमेह दिन आणि राष्ट्रीय बाल दिनानिमित्त डॉ. नांदेडकर यांची मुलाखत आणि बाल मधुमेह दत्तक योजना सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक डॉ. सतीश देसाई , तसेच अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर, विश्वस्त विलास नेवपूरकर, उपाध्यक्ष धनंजय नांदेडकर आणि प्रकल्प समन्वयक विजय निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी बाल मधुमेहींची व्याधी दत्तक घेण्यात येऊन त्यांना डॉ. नांदेडकर यांनी संशोधन करून विकसित केलेल्या औषधांचे डॉ. देसाई यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.

डॉ. नांदेडकर म्हणाले, ‘‘बालमधुमेहाविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे. या व्याधीमुळे बरेचदा पालक देखील भांबावून जातात. बालमधुमेहींचा आहार, इन्शुलिनचे व्यवस्थापन, दैनंदिन रक्त शर्करा तपासणीच्या नोंदी आणि व्यायाम या चतुःसुत्रीच्या आधारे बालमधुमेहाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येते. यासाठी पालकांना इन्शुलिनचा डोस कधी, कसा आणि किती प्रमाणात द्यायचा याचे योग्य प्रशिक्षण घ्यावे लागते.’’ बालमधुमेहींचा आहार कसा असावा, त्यांनी कोणत्या प्रकारचे खेळ खेळावे, योगासन, प्राणायाम आणि ध्यान धारणेच्या माध्यमातून मानसिक बळ कसे वाढवावे, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नांदेडकर यांची मुलाखत ममता क्षेमकल्याणी यांनी घेतली. विलास नेवपूरकर यांनी आभार मानले.