अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

बालहक्क सप्ताहानिमित्त विविध उपक्रम
पुणे : बालहक्क कृती समितीतर्फे १४ ते २० नोव्हेंबर या बालहक्क सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे विविध कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन खुले असेल. तसेच, या सप्ताहात विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून वस्तीपातळीवरील मुलांसाठी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे काही आंतरराष्ट्रीय व प्रसिद्ध चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. या व्यतिरिक्त नागरी सुविधा व समस्यांबाबत युवकांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाददेखील होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी arcpune09@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे समन्वयक सुशांत आशा यांनी केले आहे.

‘क्रांतिगुरू लहुजी दौड’चे आयोजन
पुणे : क्रांतिगुरू लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समिती, पुणे यांच्यातर्फे लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिगुरू लहुजी दौडचे आयोजन केले होते. रॅलीचे उद्‍घाटन आमदार दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले. स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा येथून सुरू होऊन संगमवाडी पुलावरील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळापाशी रॅलीचा समारोप झाला. समारोपप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रमकुमार, आमदार सुनील कांबळे, रॅलीचे आयोजक सुनील खंडाळे, सुनील दुबळे, डॉ. सुनील भंडगे, मुकुंद माने आदी उपस्थित होते. या रॅलीमध्ये द महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, क्रीडाभारती या संस्था सहभागी झाल्या होत्या.

विद्या उत्तेजक ट्रस्टतर्फे गुणगौरव समारंभ
पुणे : विद्या उत्तेजक ट्रस्ट, पुणे या संस्थेतर्फे शिक्षण व विविध क्षेत्रांत कौतुकास्पद कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर व कौस्तुभ बुटाला यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या वेळी डॉ. प्रकाश शेठ आणि शीला धारिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘‘विद्या उत्तेजक ट्रस्टचे शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. इतर संस्थांनीही याचे अनुकरण करणे गरजेचे आहे,’’ असे मत डॉ. कोहिनकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. संदीप बुटाला, संस्थेचे अध्यक्ष अनिल गांधी, कार्यवाह रोहित शहा, खजिनदार प्रणव शेठ आदी उपस्थित होते. संगीता शेठ व राजश्री शेठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.