राज्य नाट्य स्पर्धेमुळे जडणघडण ः वैद्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य स्पर्धेमुळे जडणघडण ः वैद्य
राज्य नाट्य स्पर्धेमुळे जडणघडण ः वैद्य

राज्य नाट्य स्पर्धेमुळे जडणघडण ः वैद्य

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः ‘‘माझ्यासाठी एकांकिका स्पर्धा या नाटकांच्या क्षेत्रातील माझी शाळा होती. तर राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे माझ्यासाठी नाटकाचे विद्यापीठ होते. मी नाटक कुठेही शिकलो नाही, कोणत्याही कार्यशाळा केल्या नाहीत, तर मी राज्य नाट्य स्पर्धेत नाटक शिकलो. हे आजही मी अभिमानाने सांगतो. माझ्या नाट्य क्षेत्रातील जडणघडणीत राज्य नाट्य स्पर्धेचा मोलाचा वाटा आहे’’, असे मत नाट्य दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकार प्रदीप वैद्य यांनी मंगळवारी व्यक्त केली.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीचे उद्घाटन वैद्य यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहसंचालिका सुनीता असावले, स्पर्धेचे परीक्षक मदन दंडगे, अरुण भडसावळे, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा संदेश असलेला व्हिडिओ दाखविण्यात आला.
वैद्य म्हणाले, ‘‘राज्य नाट्य स्पर्धा ६१ वर्षांपासून आयोजित केली जात आहे. सरकारने हौशी रंगकर्मींसाठी सातत्याने ६१ वर्षे एखादी स्पर्धा आयोजित करणे, ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. ती महाराष्ट्रात घडत आहे, हे उल्लेखनीय आहे. माझा स्पर्धेतील शिरकाव १९८४ मध्ये पहिल्यांदा झाला. तेव्हापासून या स्पर्धेशी जुळलेली नाळ आजही कायम आहे.’’ स्पर्धेचे समन्वयक राहुल लामखेडे यांनी प्रास्ताविक केले.

७ डिसेंबरपर्यंत स्पर्धा रंगणार
पहिल्या दिवशी योगेश पार्क सहकारी गृहरचना संस्थेच्या ‘बावळेवाडी’ या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला. ७ डिसेंबरपर्यंत सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे ही फेरी रंगणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता प्रत्येकी एका नाटकाचे सादरीकरण होईल. मात्र, २७ नोव्हेंबर रोजी कोणत्याही नाटकाचे सादरीकरण होणार नाही.