‘पाटबंधारे’ने पाणी कोट्याची माहिती द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पाटबंधारे’ने पाणी कोट्याची माहिती द्यावी
‘पाटबंधारे’ने पाणी कोट्याची माहिती द्यावी

‘पाटबंधारे’ने पाणी कोट्याची माहिती द्यावी

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पुण्याचा झपाट्याने विस्तार होत असल्याने शेती क्षेत्र कमी झाले आहे. या जमिनीवरील सिंचनासाठी असणारा पाणी वापरही बंद झाला. परंतु हे क्षेत्र नेमके किती कमी झाले, किती पाण्याचा फायदा शहराला होईल, याबाबत अस्पष्टता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याचा अभ्यास करून कमी झालेल्या शेती क्षेत्राचे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्राद्वारे केली आहे.

खडकवासला धरण प्रकल्पात २९.१५ टीएमसी पाणीसाठा जमा होतो. पुणे शहराला २००५ पासून ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. गेल्या २० वर्षांत पुण्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहे. ३४ गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत. महापालिकेच्या पाण्याच्या ऑडिटमध्ये ६९ लाख ४१ हजार शहराची लोकसंख्या असल्याचे नमूद केले आहे.

पुणे शहराची हद्द ५४३ चौ. किमी झाली आहे. शहरासाठी खडकवासला व भामा आसखेड धरणातून वर्षाला ११.५० टीएमसी पाणी दिले जाते. हे पाणी अपुरे पडत असून, महापालिका वर्षाला २० टीएमसी पाणी उचलत आहे. या अतिरिक्त पाणी वापरासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा दंडही महापालिका पाटबंधारे विभागाला देत आहे.

लाभक्षेत्राचा अभ्यास आवश्‍यक
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी सिंचन व बिगर सिंचन क्षेत्र पद्धतीने आरक्षित आहे. यापूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती पाहात निवासी क्षेत्राचा विस्तार झाला असून सिंचनाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे सिंचनाचे पाणी कमी वापर होऊन ते पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. खडकवासला लाभक्षेत्रातील पाणी वाटपाचे पुन्हा मोजमाप आवश्‍यक आहे. हा मुद्दा जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सुनावणीमध्येही उपस्थित झाला आहे. प्राधिकरणानेही अभ्यास करून निवासी भागासाठी पाणी देण्याच्या सूचना केल्या आहेत.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सुनावणीमध्ये कमी झालेल्या शेती क्षेत्राचे पाणी शहराला मिळावे यावर चर्चा झाली. तशा सूचनाही प्राधिकरणाने पाटबंधारे विभागाला केल्या आहेत. त्यानुसार आम्ही पाटबंधारे विभागाला पत्र पाठवले आहे. शेती क्षेत्राचे पाणी शहराला मिळाले तर त्याचा फायदा होईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

दृष्टिक्षेपात
पुण्याचा दैनंदिन पाणी वापर - १,६०० एमएलडी
वर्षाचा पाणी वापर - १८ टीएमसी
आवश्‍यक पाणी - २०.३४ टीएमसी
मंजूर पाणी कोटा - ११.५० टीएमसी
खडकवासला धरणाची क्षमता - २९.१५ टीएमसी