चित्रपटात अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपटात अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाही
चित्रपटात अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाही

चित्रपटात अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाही

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज प्राध्यापक रुपाली देशपांडे, अमर देशपांडे, किरण देशपांडे आदींनी बुधवारी पत्रकार परिषदेत हे आक्षेप नोंदवले.

रुपाली देशपांडे म्हणाल्या, ‘‘सिनेमॅटिक लिबर्टी याचा अर्थ इतिहास बदलणे, असा नक्कीच होत नाही, तसेच ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे अनुचित आहे. दुर्दैवाने, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखवलेल्या आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट दाखवावा, अशी आम्ही या चित्रपटातील कलाकार सुबोध भावे यांना विनंती केली होती. परंतु, तसे झाले नाही. चित्रपटाला आमचा विरोध नाही, परंतु यातील काही दृश्यांबद्दल आम्हाला आक्षेप आहेत. याबाबत कायदेशीर अर्ज पाठवला असून आम्ही चित्रपटाच्या निर्मात्यांशी संवाद साधणार आहोत. संवादाने प्रश्न सुटला नाही तर कारवाई करण्याचा विचार करू.’’

वंशजांनी नोंदवलेले आक्षेप ः
- बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत असल्याचे दाखवले आहे, हे खटकणारे आहे.
- शिरवळ येथे समुद्र असल्याचे दाखवले आहे, मात्र तेथे नदी आहे. तिथे त्याकाळी इंग्रजांचे प्राबल्यही नव्हते.
- बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे या भावंडांमधील लहानपणीच्या कटू प्रसंगांनाही कोणताही ऐतिहासिक आधार नाही.
- अफजलखानाच्या वधाप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे हजर असल्याचे चित्रपटात दाखवले आहे, मात्र वास्तविक तेव्हा ते तेथे नव्हते.
- बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यात भलत्याच कारणावरून वाद झाल्याचे दाखवण्यात आले आहे.