पाण्याचा हिशेब लागणार कसा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याचा हिशेब
लागणार कसा?
पाण्याचा हिशेब लागणार कसा?

पाण्याचा हिशेब लागणार कसा?

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः ‘‘आमच्या सोसायटीतील २७ फ्लॅटमध्ये जवळपास ११० सदस्य राहत आहेत. मात्र महापालिकेने कोणतीही खातरजमा न करता २ कुटुंबे आणि २६ जण राहत असल्याचे सांगत अतिरिक्त पाणीवापराची नोटीस बजावली आहे, ती पूर्णतः चुकीची आहे. समान पाणी पुरवठा योजनेतील या सदोष पद्धतीमुळे भविष्यात सोसायटीच्या नावाने पाणी बिल येईल, तेव्हा कोणत्या कुटुंबाने किती पाणी वापरले? ज्यांचे फ्लॅट बंद आहेत किंवा कमी सदस्य आहेत, त्यांचे काय, असे अनेक प्रश्‍न उद्‍भवणार आहेत. त्यामुळे महापालिकेने याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी, अशी तक्रारवजा मागणी सिंहगड रस्त्यावरील ‘सेया’ सोसायटीतील उदय जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली.


नागरिकांत का उडाला गोंधळ?
महापालिकेने पाठविलेल्या नोटिसांबाबत नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने सेया सोसायटीला भेट देऊन पाहणी केली. सोसायटीत ४९ फ्लॅट असले तरी तेथील २७ फ्लॅटमध्ये सध्या रहिवासी राहत आहेत. बाकीचे फ्लॅट बंद आहेत. पालिकेने सोसायटीसाठी दोन पाणी मीटर बसविले आहेत. मात्र महापालिकेच्या नोटिशीत एकूण २ कुटुंबे आणि २६ जण राहत असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रतिदिन प्रतिव्यक्ती १५० लिटर या नियमाप्रमाणे रोज ३ हजार ९०० लिटर पाणी वापरले पाहिजे, पण त्याऐवजी ९ हजार ९३ लिटर पाणी वापरले जात असल्याचा ठपका ठेवला आहे. याबाबत जोशी पुढे म्हणाले, ‘‘आमच्या सोसायटीचा सध्याचा पाणी वापर पाहता आम्ही नक्कीच प्रतिदिन प्रतिव्यक्ती १५० लिटरपेक्षा कमी वापरत आहोत. पण महापालिकेने ही आकडेवारी कशी काढली, हेच कळत नाही.’’

पाण्याचा हिशेब लावणार कसा?
ही स्थिती केवळ सेया सोसायटीची नाही, तर शहरातील तब्बल ४ हजार ६०० ग्राहकांची (सोसायटी, बंगला, रो-हाउस) आहे. महापालिकेच्या नोटिशीतील कुटुंब संख्या, रहिवासी संख्या चुकीची असल्याने नागरिकांत गोंधळाचे वातावरण आहे. येत्या वर्षभरात ही योजना पूर्ण करून प्रत्येक ग्राहकास पाणी बिल पाठविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे; मात्र त्या पुढे सोसायटीमधील कोणत्या फ्लॅटधारकाने किती पाणी वापरले, याचा हिशेब लावणे व त्यानुसार अंतर्गत बिल वाटप करणे सोसायटीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. महापालिका केवळ सोसायटीच्या दारात पाणी देणार आहे. त्यानंतरचे मोजमाज सोसायट्यांनी पहावे, असे प्रकार घडणार आहे.


अशी आहे पुरवठा योजना
महापालिकेने जलसंपदा विभागाला सादर केलेल्या पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार, २०२२-२३ वर्षात समाविष्ट गावांसह शहराची लोकसंख्या ६९ लाख ४१ हजार ४६० (कामानिमित्त पुण्यात ये-जा करणाऱ्या लोकसंख्येसह) असल्याचे नमूद केले आहे. सध्या शहराचा दैनंदिन पाणी वापर १६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी-मिलिनियम लिटर पर डे) आहे. मात्र ४० टक्के पाण्याची गळती व यंत्रणेतील त्रुटींमुळे असमान पाणीपुरवठा होत आहे. यात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने २ हजार ४५० कोटी रुपयांची समान पाणी पुरवठा योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

अशी आहे योजना
कामाची सुरवात-ः २०१७
पाण्याच्या टाक्यांची संख्या ः ८२
बांधून पूर्ण झालेल्या टाक्या ः ४२
एकूण जलवाहिन्यांची लांबी ः १२५० किलोमीटर
आत्तापर्यंत टाकलेली जलवाहिनी ः ८०० किलोमीटर
एकूण बसविण्यात येणारे मीटर ः ३.१८ लाख
आत्तापर्यंत बसवलेले मीटर ः १ लाख
नोव्हेंबर २०२२ पर्यंत झालेले काम ः ५५ टक्के
योजना पूर्ण होण्याची अंतिम मुदत ः मार्च २०२४
योजनेचा खर्च ः २४५० कोटी


सोसायट्यांची डोकेदुखी वाढणार
सोसायट्यांच्या नळजोडण्यांनुसार सध्या त्यांना मीटर बसवले आहेत. भविष्यात दर महिन्याला पाण्याचे बिल पाठवले जाईल. मात्र सोसायटीच्या प्रत्येक फ्लॅटला मीटर नसल्याने कोणी किती पाण्याचा वापर केला, हे कळू शकणार नाही. सर्व फ्लॅटमध्ये मिळून बिलाची रक्कम वसूल केली जाणार आहे. याचा फटका ज्यांच्या कुटुंबात कमी लोक आहेत किंवा फ्लॅट बंद आहेत, अशांना जास्त पाणीपट्टीच्या रूपातून बसणार आहे. त्यामुळे सोसायट्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने केवळ सोसायटीपर्यंत समान पाणी पुरवठा योजना आणली, पण सोसायटीच्या आतमध्ये काय करायचे, याचा विचार या योजनेत झालेला नाही.

सदोष माहिती हेच मूळ कारण
जास्त पाणी वापरले म्हणून महापालिकेने सोसायट्या, बंगल्यांना नोटिसा बजावून थेट कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. त्यातच सोसायटीची महापालिकेकडील माहिती सदोष आहे. महापालिकेने ती सोसायटीचे अध्यक्ष, सुरक्षारक्षक, इतर कामगारांशी चौकशी करून निश्‍चित केल्याचा धक्कादायक खुलासा अधिकारी करत आहेत. यावरून टीका सुरू होताच नोटिशीमध्ये चुका असतील तर त्यात सुधारणा करून दिल्या जातील, अशी सारवासारव पालिका अधिकाऱ्यांनी केली आहे.

प्रत्येक वर्षाला बिलात ५ टक्के वाढ
पुणे महापालिकेने फेब्रुवारी २०१६ मध्ये केलेल्या ठरावानुसार, सरासरी एका कुटुंबात ४.५ व्यक्ती आहेत, असे गृहित धरले आहे. त्या वेळी पुणे शहराची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कमी असल्याने दरडोई प्रतिदिन १३५ लिटर पाणी दिले जाणार होते. त्यानुसार महापालिकेने प्रतिकुटुंबाला प्रतिमहिना १८.६० किलो लिटर (१८,६०० लिटर) हा किमान पाणीवापर ग्राह्य धरला होता. मात्र, आता योजना प्रत्यक्षात येत असताना २०२२-२३ मध्ये लोकसंख्या ५० लाखांच्या पुढे गेल्याने महापालिकेने दरडोई प्रतिदिन १५० लिटर पाणी वापर निश्चित केला आहे. आता प्रतिकुटंबाने प्रत्येक महिन्याला २०.२५ किलो लिटर (२०,२५० लिटर) पाणी वापरल्यास त्यांना ५.५ रुपये प्रतिकिलोलिटर पाणीपट्टी येणार आहे. २०१६ पासून पुढे दरवर्षी या पाणीपट्टीत ५ टक्के वाढ होत आहे. त्यानुसार २०२२-२३ या वर्षातील पाणीपट्टी प्रतिकिलो लिटर ७.३७ रुपये इतकी झाली आहे. जर एका कुटुंबाने दर महिन्याला २०.२५ किलोलिटर पाणी वापरले तर त्यांना दर महिन्याला १४९ रुपये बिल येईल. तर वर्षाला १७८८ रुपये इतके बिल येणार आहे. जे कुटुंब प्रतिमहिना १८.६० किलो लिटर ते ३० किलो लिटर पाणी वापरेल त्यास १.६७ पट, तर ३० किलो लिटर ते ३७.५० किलोलिटर पाणी वापरतील, त्यांना ३.३२ पटीने आणि ३७.५० किलो लिटरपेक्षा जास्त वापरणाऱ्या कुटुंबाला तब्बल पाच पट जास्त पाणी बिल येणार आहे. जेवढा वापर जास्त, तेवढा पाण्याचा दर वाढणार आहे. महापालिका सध्या मिळकतकरातूनच पाणीपट्टी वसूल करत आहे. मीटर रीडिंगनुसार पाणी बिल घेण्यासाठी मुख्यसभेसमोर प्रस्ताव ठेवावा लागेल. त्यानंतर मिळकतकरातून पाणीपट्टी वजा करून त्याचे प्रत्येक महिन्याला स्वतंत्र बिल काढले जाईल.

(साडेतीन टीएमसी पाण्याची बचत)
महापालिकेच्या अभ्यासनुसार पाणी पुरवठा यंत्रणेत ४० टक्के गळती आहे. म्हणजे रोजच्या १६०० एमएलडी पाण्यापैकी ६४० एमएलडी पाणी वाया जात आहे. समान पाणी पुरवठा योजनेनंतर या गळतीत ५० टक्के कपात होऊन रोजची ३२० एमएलडी पाण्याची बचत होईल. एका वर्षाला साधारणपणे १ लाख एमएलडी पाण्याची बचत होऊ शकते. म्हणजे २.५७ टीएमसी साधारण पाणी गळती होईल. तसेच मीटरमुळे एकूणच पाणी वापर १ टीएमसीपर्यंत कमी होईल. त्यामुळे ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर महापालिकेचा एकूण ३.५० टीएमसी पाणी वापर कमी होणार आहे, असा दावा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

कोल्हापूरमध्ये मीटरनेच पाणी
मीटरने पाणीपुरवठा करण्याची पद्धत राज्यात यापूर्वी कोल्हापूरमध्ये महापालिकेने राबविली आहे. तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे अभियंता हर्षजित घाटगे यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने संवाद साधला असता अधिक माहिती प्राप्त झाली.
हर्षजित घाटगे म्हणाले...
- कोल्हापूरमध्ये ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून मीटरची पद्धत आहे.
- शहराची सध्याची लोकसंख्या साडेपाच लाख इतकी आहे.
- १ लाख ५ हजार २३४ एकूण ग्राहक (१ लाख २ हजार २९९ घरगुती, १६४४ बिगर घरगुती आणि १३०१ औद्योगिक)
- प्रत्येक झोपडीलाही मीटर बसवलेले आहेत.
- ५० टक्क्यांपर्यंत दर महिन्याला पाणीपट्टी वसूल होते.
- घरगुती ग्राहकास प्रतिमहा किमान १९९ रुपये बिल येते.
- नागरिक स्वतः बाजारातून मीटर विकत घेतात.
- महापालिकेने ते मीटर प्रमाणित करून दिल्यानंतर बिल सुरू होते.
- शहरात सध्या ६०० किलोमीटरची जलवाहिनी असून, अमृत योजनेतून आणखी ४०० किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाणार


नांदेड सिटीत प्रत्येक फ्लॅटला मीटर
शहरातील नांदडे सिटी टाउनशिपमध्ये स्थापनेपासूनच प्रीपेड पाणी मीटरची व्यवस्था आहे. १२ हजार २५० फ्लॅट आणि ५० दुकानांना मीटरने पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे सोसायट्यांऐवजी थेट फ्लॅटला मीटरची व्यवस्था केल्याने फ्लॅटधारक जेवढे पाणी वापरतो त्याचे बिल येते. नांदेड सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर म्हणाले, ‘‘सुरवातीपासूनच नांदेड सिटीत प्रत्येक फ्लॅटला मीटर बसवले आहेत. प्रीपेड पाणी मीटर असल्याने नागरिक रिचार्ज करतात आणि त्याअनुषंगाने पाणी वापरतात. केवळ सोसायटीला मीटर बसविल्यास कोणत्या फ्लॅटधारकाने किती पाणी वापरले, यात स्पष्टता असलेच असे नाही. काही घरात जास्त सदस्य, तर काही घरात कमी सदस्य असणार, काही फ्लॅट बंद असणार त्यामुळे पुरवठा झालेल्या पाण्याचे बिल सर्वांमध्ये समान विभागून दिले तरी त्यातून मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यासाठी वैयक्तिक मीटर दिले गेले पाहिजेत. जुन्या इमारतींना शक्य नसले तरी आता नव्याने बांधकाम होणाऱ्या इमारतींसाठी तसा धोरणात्मक निर्णय घेणे आवश्‍यक ठरेल, असे माझे मत आहे.’’


आकडे बोलतात...

- ३.१८ लाख
ग्राहकांसाठी मीटर खरेदी

- ७५०० रुपये
प्रत्येक मीटरची किंमत
(महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून निश्‍चित)

- १० वर्षे
मीटरचे आयुर्मान
(खराब झाल्यास बदलून दिला जातो)

- ५०० मीटर
- जलवाहिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी

- आयपर्ल या कंपनीकडून ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक’ पाणी मीटरची खरेदी
- तीन मीटर खोल पाण्यातदेखील हे मीटर काम करतात
- महापालिकेचे कर्मचारी रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे रीडिंग घेऊ शकतात
- मीटर बिघाड, काढून टाकणे, पाणी चोरी या प्रकारांना आळा बसेल
- मीटरच्या रीडिंगवरून कोणत्या भागात किती पाणी गेले, किती वापरले, गळती आहे का? हे कळणार

आत्तापर्यंत कोण किती पाणी वापरतो? हे महापालिकेला माहिती नव्हते. पण या मीटरचे रीडिंग आल्याने पाणी वापराची माहिती समोर आली. निकषापेक्षा जास्त पाणी वापर केलेल्या ग्राहकांना नोटीस दिली आहे. अनावश्‍यक पाणी वापर टाळावा, असा उद्देश यामागे आहे. कोणत्या सोसायटीमध्ये किती फ्लॅट आहेत, किती लोक राहतात याची माहिती उपलब्ध नाही. मात्र ठेकेदाराने सोसायटीत चौकशी करून ही संख्या काढली आहे. त्यामुळे त्यात चुका असतील तर त्या सुधारल्या जातील. आतापर्यंत ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल. योजना पूर्ण झाल्यानंतर वर्षाला किमान साडेतीन टीएमसी पाणी बचत होईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

समान पाणी पुरवठा योजना उत्तम आहे. फक्त यात आणखी पारदर्शकता हवी आहे. एमएनजीएल, महावितरणने नागरिकांना सहभागी करून दर महिन्याला स्वतःच मीटरचे फोटो पाठवावे, असे सांगितले आहे. तसेच महापालिकेने करावे. त्यासाठी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करता येतील. तसेच निकषानुसार आम्हाला ४ लोकांसाठी ६०० लिटर पाणी रोज वापरता येते. मात्र पाणी वापर जास्त दाखवला आहे. एक तर रिडिंग बरोबर घेतले नाही किंवा दीड-दोन महिन्यांचे एकदम रीडिंग घेतले असावेत, असे वाटत आहे. यात पादर्शकता आली पाहिजे.
- प्रसाद बापट, स्टेट बँक कॉलनी, सिंहगड रस्ता

पुण्यातील सर्व सोसायट्यांना समान पाणी मिळाले पाहिजे. ज्या सोसायट्यांना जास्त पाणी येत आहे, त्यांनी योग्य प्रमाणात वापरावे, त्यामुळे इतरांना पाणी मिळेल. महापालिकेने नुकतेच मीटर बसवले आहेत, असे असताना कारवाईचा दिलेला इशारा योग्य नाही.
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ

प्रतिव्यक्ती १५० लिटर
केंद्र सरकारच्या केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण इंजिनिअरिंग संस्थेने (सीपीएचईईओ-सेंट्रल पब्लिक हेल्थ अँड एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन-सीपीएचईईओ) लोकसंख्येनिहाय किती लिटर पाणी वापरावे, याचे निकष निश्‍चित केले आहेत. सध्या पुण्याची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ‘सीपीएचईईओ’च्या निकषानुसार ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असेल, तर प्रतिव्यक्ती प्रतिदिन १३५ लिटर आणि ५० लाखांपेक्षा जास्त असेल, तर प्रतिव्यक्ती प्रतिदिन १५० लिटर पाणी वापरता येते.

पुण्यातील मिळकती (२०२२-२३)
निवासी मिळकती ः ६ लाख
व्यावसायिक मिळकती ः २ लाख
मोकळ्या जागा ः ३० हजार
संमिश्र वापर ः २२ हजार
एकूण मिळकती (३४ गावे वगळून) ः १२.५ लाख
निवासी मिळकतींनी बसलेले मीटर ः सुमारे ७५ हजार (८० टक्के सोसायटी, २० टक्के बंगले)
व्यावसायिक मिळकतींना बसलेले मीटर ः सुमारे २५ हजार

योजनेबाबत उपस्थित प्रश्न अनुत्तरीत?
- वारंवार मुदतवाढ मिळणाऱ्या योजनेचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण कसे करणार?
- सोसायटीच्या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी व्यवस्था काय असणार?
- प्रत्येक नागरिकास १५० लिटर प्रितदिन पाणी देण्याची हमी मिळणार का?
- दहा वर्षांनंतर मीटरचे आयुर्मान संपल्यावर मीटर बसविण्याची जबाबदारी कोणाची?
- योजना पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा दाब, अपुरा पाणीपुरवठा या समस्या संपणार का?