चप्पल हवी टिकाऊ आहे का तशी विकाऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चप्पल हवी टिकाऊ
आहे का तशी विकाऊ
चप्पल हवी टिकाऊ आहे का तशी विकाऊ

चप्पल हवी टिकाऊ आहे का तशी विकाऊ

sakal_logo
By

‘‘देखो भैय्या, हमको चप्पल इतनी मजबूत होनी चाहिए, की स्कुटी चलाते समय अगर हमे तातडीने थांबना है, तो रस्ते पर चप्पल को कितना बी जोरसे घसट लू, तो बी चप्पल पर छोटा सा व्रण बी नही पडना चाहिए. ऐसी टिकाऊ चप्पल दिखाओ.’’ सायलीने चप्पलविक्रेत्याला म्हटले.
त्यानंतर त्याने काही चपला तिच्या पुढे ठेवल्या.
‘‘हमको चप्पल मजबूत बी चाहिए और दिखने में स्मार्ट बी चाहिए. पाऊस मे भिजेगी, तो बी वह कुचकामी नही होनी चाहिए.’’ सायलीने सगळ्या चप्पल नापसंत करत म्हटले.
‘‘स्कुटी स्पेशल चप्पल दिखाव ना. उस चप्पल का तळवा लोखंड जैसा कठीण होना चाहिए. उस तळवे को मैने वरवंटा से कुट्या, चेच्या, रगड्या फिर भी उसको किरकोळ बी तडा नही जाना चाहिए.’’ सायलीने म्हटले. त्यावर विक्रेता म्हणाला, ‘‘ताई, तुम्हाला विमानाच्या टायरपासून बनवलेल्या चपला दाखवू का?’’ विक्रेत्याचे मराठी ऐकून सायली वरमली.
‘‘तुम मराठी माणूस हय क्या? हमे लगा तूम भैय्या है, इसलिए हम हिंदी मे सुट्या.’’ असे म्हणून सायलीने जीभ चावली.
‘‘काय हो, विमानाच्या टायरपासून बनवलेल्या चपला तुमच्याकडे आहेत, तशा रणगाड्याच्या टायरपासून बनवलेल्या चपला आहेत का? मजबुतीसाठी विचारतेय हो.’’ सायलीने शंका विचारली.
‘‘टायर असलेला रणगाडा तुम्ही कोठे पाहिलाय? आमच्याकडे अजून तशा चपला आल्या नाहीत.’’ विक्रेत्याने म्हटले.
‘‘काय बाई, गेल्या आठ दिवसांपासून मनासारखी चप्पल मिळत नाही. आज सकाळपासून दहा दुकाने मी पालथी घातली तरी मला हवी तशी चप्पल मिळत नाही. आम्हा बायकांच्या आवडी- निवडी कंपनीवाले लक्षात घेणार आहेत की नाही. हल्ली चप्पलामध्ये व्हरायटीच मिळत नाही.’’ सायलीने नाराजी व्यक्त करीत म्हटले. त्यानंतर विक्रेत्याने आणखी काही चपला दाखवल्या.
‘‘अहो हिचा रंग किती बोअर आहे. टोमॅटो कलरमध्ये दाखवा.’’ सायलीने म्हटल्यावर विक्रेत्याने दोन- तीन चप्पलचे जोड दाखवले.
‘‘अहो पिकलेल्या टोमॅटोसारखा कलर नव्हे. कच्च्या टोमॅटोसारखा कलर दाखवा. त्यावर अस्वली कलरचा बंध दाखवा आणि चित्ता कलरचा अंगठा दाखवा. चप्पल कशी कलरफूल दिसली पाहिजे.’’ सायलीने असे म्हटल्यावर विक्रेत्याने आणखी काही चपला दाखवल्या.
‘‘ही चप्पल चांगली आहे पण नेमकी याच पॅटर्नमधील चप्पल शेजारणीने मागच्या आठवड्यात खरेदी केली आहे. मीदेखील तशीच चप्पल घेतल्यावर ‘सगळं काही माझं अनुकरण करते’ असं म्हणून सोसायटीमध्ये माझी बदनामी करत सुटेल. त्यामुळे दुसरी चप्पल दाखवा.’’ सायलीने असे म्हटल्यावर विक्रेत्याने आणखी काही चपला दाखवल्या. थोड्याच वेळात दुकानातील सगळ्या चपला खाली आल्या पण त्यातील तिला एकही चप्पल पसंत पडेना.
चप्पलांच्या ढिगाऱ्यातून शेवटी तिने एक चप्पलजोड काढली व म्हणाली, ‘‘ही चप्पल मला पसंत पडली आहे.’’ त्यावर विक्रेत्याचा जीव भांड्यात पडला. तरीही त्याने ‘नक्की ना?’ असे विचारले. त्यावर तिने ‘‘हो. अगदी नक्की. हीच चप्पल मी घेणार आहे. किती किंमत आहे?’’ तिने विचारले.
‘‘ही चप्पल तुम्ही फुकट घेऊन जा.’’ विक्रेत्याने म्हटले. दुकानात आपण फार उचकापाचक केल्याने चिडून विक्रेता असं म्हणत आहे, असा तिचा समज झाला.
‘‘असं रागावू नका. पण मी चप्पल फुकट का नेऊ? माझ्या तत्वात ते बसत नाही.’’ सायलीने म्हटले. त्यावर दोन्ही हात जोडून विक्रेता म्हणाला, ‘‘कारण ताई, तुम्ही पायात घालून आलेल्या त्या चपला आहेत. ग्राहकाने पायात घालून आलेल्या चपलांचे पैसे घेणे हे माझ्या तत्वात बसत नाही.’’