उद्योगांना महापारेषणचा ‘झटका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगांना महापारेषणचा ‘झटका’
उद्योगांना महापारेषणचा ‘झटका’

उद्योगांना महापारेषणचा ‘झटका’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १६ : आयटी, ऑटोमोबाईल आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठी पूरक ठरणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत मात्र महापारेषणसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. महापारेषणची अतिउच्च दाबाची अनेक उपकेंद्रे, टॉवर लाइनचे सक्षमीकरण व इतर कामे गेल्या काही वर्षांपासून रखडली आहेत. त्याचा फटका वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन उद्योग आणि नागरिकांना बसत आहे.

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने हद्दीचा प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच प्रसिद्ध केला आहे. त्यावरील हरकती-सुनावणींची प्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिन्यांत तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे. या आराखड्यात हद्दीत १८ ‘ग्रोथ सेंटर’सह पर्यटन, कृषी, निवासी, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्राला गती देण्यासाठी अनेक योजना प्रस्तावित आहेत. त्यामुळे भविष्यात या क्षेत्राचा विकास गतीने होऊन मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आणि लोकसंख्या वाढणार आहे. त्याचा विचार करून त्यांना वीजपुरवठा सुरळीत कसा होईल, याचे नियोजन महापारेषणकडून होणे अपेक्षित आहे.

तीन महिन्यांत १८ वेळा पुरवठा खंडित
- वीज यंत्रणा अतिभारीत होत असल्यामुळे दोन ते तीन महिन्यांत महापारेषणच्या अतिउच्चदाब उपक्रेंदामधील तब्बल आठ पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले.
- १८ ऑक्टोबरला चाकण येथील महापारेषणचा ५० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने ऐन दिवाळीत १२०० उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
- २० ऑक्टोबरला चिंचवड-तळेगाव १०० केव्ही टॉवर लाइन तुटल्याने तेथील औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांना त्याचा फटका बसला.
- ३३/२२ किंवा ३३/११ केव्ही उपकेंद्रांमध्ये किंवा वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास केवळ काही हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होतो. परंतु महापारेषणच्या अतिउच्चदाब १३२, २२० अथवा ४०० केव्ही उपकेंद्रामध्ये किंवा वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास अनेक उपकेंद्रांचा पुरवठा बंद होतो. परिणामी कमीत कमी दोन ते तीन लाख ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागतो.


या कामांना मुहूर्त कधी?
- महापारेषण कंपनीकडून हिंजवडीमध्ये ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राची उभारणी करून पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला. परंतु या उपकेंद्राला लाइन जोडली अद्याप झालेली नाही.
- मुळशी व पुणे परिसरासाठी महत्त्वाच्या १३२ केव्ही पानशेत अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठ्यासाठी केवळ एकच टॉवर लाइन आहे. या लाइनमध्ये बिघाड झाल्यास उपकेंद्र बंद पडते.
- सुरळीत विजेसाठी या उपकेंद्राला डबल सर्किट लाइनने पुरवठा करण्याचा प्रस्ताव रेंगाळला आहे. हीच स्थिती २२० केव्ही फॉक्सवॅगन अतिउच्चदाब उपकेंद्राची आहे. या उपक्रेंदाला पर्यायी वीजपुरवठा करणाऱ्या आणखी एका सर्किट टॉवर लाइनची गरज आहे. मात्र ते काम झालेले नाही.

पुणे, पिंपरीत रखडलेली कामे
- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या चिंचवड २२० केव्ही व कोथरूड १३२ केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव रखडला आहे. त्याचा परिणाम या दोन्ही शहरांतील वीजपुरवठ्यावर होत आहे.
- चाकण येथील ४०० केव्ही उपकेंद्रात एका अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. त्यामुळे चाकणमधील सहा एक्स्प्रेस फिडरवरील वीजभाराचा ताण कमी होऊ शकतो आणि तेथील मोठ्या उद्योगांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळू शकतो. मात्र हे काम सुरू झालेले नाही.

अतिभारीत झालेल्या लाइन
- ४०० केव्ही चाकण-तळेगाव पीजीसीआयएल लाइन
- २२० केव्ही चिंचवड-उर्से लाइन
- १३२ केव्ही चिंचवड-मरकळ लाइन
- रहाटणी-चिंचवड लाइन
- एनसीएल-रहाटणी लाइन,
- कोथरूड-एनसीएल लाइन


या उपाययोजनांची गरज
- पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द आणि ‘पीएमआरडीए’च्या भागाचा गतीने विकसित होत आहे. याचा विचार करून आणि भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन अस्तित्वातील वीज यंत्रणा सक्षम करणे, नव्याने पायाभूत सुविधा विकसित करणे याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
- ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यात अतिउच्चदाबाचे उपकेंद्र उभारण्यासाठी जागा निश्‍चित करून हा प्रश्न मार्गी लावणे.

पीएमआरडीए हद्दीतील भाग
पुणे, पिंपरी-चिंचवड (पालिका हद्द वगळून), मावळ, मुळशी, हवेली तालुक्याचा काही परिसर आणि भोर, शिरूर, खेड, पुरंदर, वेल्हे व दौंड तालुक्याचा काही भाग


७००० चौरस किमी
पीएमआरडीएचा एकूण परिसर

८००
समाविष्ट गावे

८० लाख
परिसरातील लोकसंख्या

१० हजार
छोट्या आणि मोठ्या मिळून कंपन्या

पीएमआरडीए विभागातील वीजपुरवठाच्या समस्यांबाबत यापूर्वीच उद्योगमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांनीदेखील यात लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले आहे.
- प्रशांत गिरबाने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर


पीएमआरडीए विभागाचा विकास ज्या गतीने होत आहे, तसेच भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठीचे काम महापारेषणाकडून हाती घेण्यात आले आहे. अपूर्ण कामांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे.
- राजेंद्र गायकवाड, मुख्य अभियंता, महापारेषण कंपनी

शिवणे औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठ्याबाबत फारशा अडचणी नाहीत. परंतु नव्याने वीजजोड मिळत नाही, याबाबत विचारणा केली तर तेथील सर्व ट्रान्सफॉर्मर हे अतिभारीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नव्या उद्योगांना वीजपुरवठा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लगातो.
- परवेज खान, उद्योजक

Stock Vector ID: 614260670