पाठ्यपुस्तकात तातडीने बदल अशक्य! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाठ्यपुस्तकात तातडीने बदल अशक्य!
पाठ्यपुस्तकात तातडीने बदल अशक्य!

पाठ्यपुस्तकात तातडीने बदल अशक्य!

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : राज्यात सर्व ठिकाणी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला आणि अंक वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी मराठी पाठ्यपुस्तकात मात्र इतक्यात हे बदल होणे अशक्य आहे. सध्या राज्यातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या हातात प्रचलित पद्धतीने अक्षरे, अंक वापरलेली पाठ्यपुस्तके आहेत. तसेच नव्याने पाठ्यपुस्तके छापताना हे बदल तातडीने केल्यास गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यास मंडळ, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पाठ्यपुस्तकात हे बदल करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, पाठ्यपुस्तके अशा सर्व ठिकाणी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला आणि अंक वापरण्याचे आदेश राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने १० नोव्हेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाद्वारे दिले आहेत. या निर्णयानंतर पाठ्यपुस्तकात बदल करणे आवश्यक असल्याने त्याप्रमाणे पाठ्यपुस्तकात बदल होणार का, याबाबत बालभारतीच्या निर्णयाची उत्सुकता सर्वांनी लागली होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रम निश्चित केल्यानंतर बालभारतीमार्फत पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि छपाई करण्यात येते. मराठी वर्णमाला आणि अक्षरमाला याबाबतच्या निर्णयानुसार बदल पाठ्यपुस्तकांमध्ये करावे लागणार आहेत.

पाठ्यपुस्तकात बदल करण्यासमोरील आव्हाने
- राज्यात कोट्यवधी विद्यार्थ्यांकडे सध्या असलेल्या पाठ्यपुस्तकात जुन्या पद्धतीनेच उल्लेख
- बाजारपेठेत पाठ्यपुस्तकांचा उपलब्ध असलेला साठा
- बालभारतीकडे शिल्लक नवी पाठ्यपुस्तके
- एकाचवेळी सर्व पाठ्यपुस्तकांत बदल करणे अशक्य
- नवीन पाठ्यपुस्तके छापताना हे बदल केल्यास अन्य इयत्तांच्या पाठ्यपुस्तकात आणि नव्या पाठ्यपुस्तकात तफावत आढळेल

राज्य सरकारने मराठी वर्णमाला, अक्षरमाला यासंदर्भात अध्यादेश काढला आहे. परंतु त्याप्रमाणे पाठ्यपुस्तकात तातडीने बदल करणे अशक्य आहे. बालभारतीने छापलेली कोट्यवधी पाठ्यपुस्तके सध्या विद्यार्थ्यांच्या हातात आहेत. तसेच अनेक पाठ्यपुस्तके छापून तयार आहेत. नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके तयार करताना, छापताना याबाबत विचार करण्यात येईल. याबाबत शालेय शिक्षण मंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पाठ्यपुस्तकात तातडीने बदल करण्याचा आग्रह धरू नये, अशी विनंतीही करण्यात येणार आहे.’’
- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती