Sugar harvest : साखरेच्या उताऱ्यात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugar harvest
साखरेच्या उताऱ्यात घट

Sugar harvest : साखरेच्या उताऱ्यात घट

पुणे : राज्यातील गाळप हंगाम जोर पकडत असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरच्या मध्यास आजअखेर उसाचे गाळप कमी झालेले आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादनही तुलनेत कमी आहे. या वर्षी उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात काही साखर कारखाने सुरू झालेले नाहीत; परंतु नोव्हेंबरअखेर गाळप हंगामाला वेग येणार आहे, तर साखरेच्या सरासरी उताऱ्यातही तुलनेत घट झाल्याचे दिसून येत आहे.

सातारा, मराठवाड्यात हंगामाला विलंब
राज्यात यंदा १५ ऑक्टोबरला गाळप हंगाम सुरू झाला. परंतु एक-दोन कारखाने वगळता बहुतांश कारखान्यांनी ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उसाचे गाळप सुरू केले. सध्या राज्यात १३८ साखर कारखान्यांमध्ये उसाचे गाळप सुरू आहे. गतवर्षी १५ नोव्हेंबरअखेर १५० कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू होता. सातारा जिल्हा आणि मराठवाड्यातील काही साखर कारखान्यांची धुराडी अजून पेटलेली नाहीत. नागपूर विभागात केवळ मानस ॲग्रो या साखर कारखान्याने गाळप सुरू केले आहे. त्यामुळे गाळप घेणाऱ्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.

गाळप सुरू असलेले राज्यातील कारखाने
६८ - सहकारी

७० - खासगी

पुढील आठवड्यापासून गाळप हंगामाला आणखी वेग येईल. साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादन घेण्यात येत आहे. परंतु यंदाच्या हंगामात इथेनॉलची विक्री सुरू केलेली नाही. येत्या एक डिसेंबरला इथेनॉलचे नवे दर जाहीर होतील. त्यानंतरच कारखान्यांकडून इथेनॉल विक्री सुरू होईल.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

गाळप हंगाम सद्य:स्थिती (विभागनिहाय २०२२-२३)
विभाग - कारखाने - ऊस गाळप (टन) - साखर उत्पादन(लाख क्विंटल) - साखर उतारा
कोल्हापूर-३२ -२७.५९ -२५.८६ -९.३७
पुणे-२४ -२४.७३ -२०.१४ -८.१४
सोलापूर-३७ -२७.०९ -१९.८३ -७.३२
नगर-१५ -१०.५१ -७.९७ -७.५८
औरंगाबाद-११ -३.७९ -२.३० -६.०७
नांदेड-१६ -३.४७ -२.२३ -६.४३
अमरावती-२ -०.७८ -०.६८ -८.७२
नागपूर- १
चालू हंगाम एकूण-१३८ -९७.९६ -७९.०१ -८.०७
गतवर्षीची स्थिती १५० -१०८.७५ -९२.३४ -८.४९