Pune : पुणे विभागात कृषीपंप ग्राहकांकडे १२ हजार कोटींची थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water-pump
पुणे विभागात कृषीपंप ग्राहकांकडे १२ हजार कोटींची थकबाकी

Pune : पुणे विभागात कृषीपंप ग्राहकांकडे १२ हजार कोटींची थकबाकी

पुणे : राज्यात कृषिपंपासाठी सगळ्यात जास्त वीजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत होत असून, लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणारे श्रीमंत शेतकरी या भागात आहेत. महागडी चारचाकी वाहन वापरणारे, बंगल्यात राहणारे व नियमित प्राप्तिकर भरणारे शेतकरी मात्र वीजबिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे आढळून आले आहे. या पाचही जिल्ह्यांत कृषिपंपासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून ऊस, फळबागा, भाजीपाला व फुलशेती यासाठी वीजेचा बारमाही वापर करणाऱ्या सधन शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांच्याकडूनही वीजबिल भरणा वेळेत होत नाही.

थकबाकीवर सूट देण्याचे धोरण
नविन कृषिपंप धोरण नुसार ३१ मार्च २०२२ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीवर ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे. तर मार्च २०२३ पर्यंतच्या थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात आलेली आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे.

जिल्हानिहाय थकबाकी
जिल्हा ग्राहकांची संख्या थकबाकी चालू बिलापोटी थकबाकी
पुणे ३ लाख १५ हजार २ हजार २९१ कोटी १ हजार २४५ कोटी
कोल्हापूर १ लाख ४७ हजार ३८८ कोटी २१९ कोटी
सातारा १ लाख ८४ हजार ६१२ कोटी ३८८ कोटी
सोलापूर ३ लाख ६९ हजार ३६०० कोटी १ हजार ७२९ कोटी
सांगली २ लाख ४० हजार १०१६ कोटी ५५५ कोटी

पुणे विभागातील थकबाकी दृष्टिक्षेपात...
कृषिपंप ग्राहक : १२ लाख ५४ हजार
थकबाकी : ७९०२ कोटी
चालू बिलापोटी : ४ हजार १३७ कोटी
एकूण थकबाकी : १२ हजार ०३९ कोटी

वीजबिल कोरे करण्याचे आवाहन
या योजनेत एकदा सहभागी झालेला ग्राहक प्रत्येक चालू बिलासह त्याच्या सोयीनुसार थकबाकी भरू शकतो. या योजनेतून वसूल झालेल्या ६६ टक्के रकमेचा वापर स्थानिक व जिल्हा पातळीवर महावितरणच्या विजेच्या पायाभूत सुविधा तसेच सेवा सुधारण्याकरिता खर्च करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणार आहे. दरम्यान, थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांनी कृषिपंप धोरण - २०२० मध्ये दिलेल्या सवलतीचा फायदा घेऊन आपले वीजबिल कोरे करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.