राज्य नाट्य स्पर्धा आता महापालिकेच्या नाट्यगृहात? भरत नाट्य मंदिराच्या दरवाढीनंतर सांस्कृतिक विभागाची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य स्पर्धा आता महापालिकेच्या नाट्यगृहात?
भरत नाट्य मंदिराच्या दरवाढीनंतर सांस्कृतिक विभागाची तयारी
राज्य नाट्य स्पर्धा आता महापालिकेच्या नाट्यगृहात? भरत नाट्य मंदिराच्या दरवाढीनंतर सांस्कृतिक विभागाची तयारी

राज्य नाट्य स्पर्धा आता महापालिकेच्या नाट्यगृहात? भरत नाट्य मंदिराच्या दरवाढीनंतर सांस्कृतिक विभागाची तयारी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : भरत नाट्य मंदिरच्या व्यवस्थापनाने वीजबिलाच्या दरात केलेल्या वाढीमुळे आगामी राज्य नाट्य स्पर्धांचे स्थळ बदलण्याच्या हालचाली सांस्कृतिक विभागाने सुरू केल्या आहेत. दरवाढ कमी करण्यासंदर्भात संचालकांची स्वाक्षरी असलेले पत्र शुक्रवारी भरत नाट्य मंदिरच्या व्यवस्थापनाला देण्यात आले. या पत्रानंतरही दरवाढ कमी न केल्यास आगामी स्पर्धा महापालिकेच्या नाट्यगृहात घेण्याची तयारी सांस्कृतिक विभागाने केली आहे.

भरत नाट्य मंदिरचे व्यवस्थापन आणि सांस्कृतिक विभाग यांच्यातील वादामुळे स्पर्धकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्याचे पडसाद उमटल्यानंतर सांस्कृतिक विभागाने हालचाली सुरू केल्या. भरत नाट्य मंदिरच्या व्यवस्थापनाने समन्वयकाच्या स्वाक्षरीचे पत्र विचारात घेणार नसल्याचे सांगितले होते. त्यापुढे नमते घेत विभागाने संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र शुक्रवारी व्यवस्थापकांना दिले. गेली अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धा आपल्या नाट्यगृहात आयोजित केली जाते. याचा विचार करून दरवाढीत सूट द्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे व्यवस्थापनाला करण्यात आली आहे.

मात्र ही सूट न मिळाल्यास सांस्कृतिक विभागाने ‘प्लॅन बी’देखील तयार केला आहे. शहरात महापालिकेची जवळपास दहा नाट्यगृहे आहेत. ही नाट्यगृहे सोडून सरकारने भरत नाट्य मंदिरासारख्या खासगी नाट्यगृहांच्या दारी जायचे कारणच काय, असा सवाल रंगकर्मी उपस्थित करत होते. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक विभागाने आगामी हिंदी राज्य नाट्य, बाल नाट्य तसेच संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात घेण्याची तयारी केली आहे. याबाबतचे पत्र तयार करण्यात आले असून, भरत नाट्य मंदिराच्या व्यवस्थापनाने दरवाढ कमी न केल्यास ते पत्र संबंधितांकडे दिले जाणार आहे.

भरत नाट्य मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेली दरवाढ कलाकार आणि शासन या दोहोंनाही परवडणारी नाही. त्यामुळे ही दरवाढ कमी करावी, अशी विनंती करणारे संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र आम्ही नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाला दिले आहे. मात्र त्यांनी दरवाढीत सूट न दिल्यास महापालिकेच्या नाट्यगृहात स्पर्धा घेण्याची आम्ही तयारी केली आहे.
- सुनीता असावले, सहसंचालिका, सांस्कृतिक कार्य संचालनालय