भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन

भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरात शुक्रवारी सकाळी आक्षेपार्ह फलक लावल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. याची गंभीर दखल घेत स्वारगेट पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर भाजप कार्यकर्ते व सावरकरप्रेमींनी या घटनेचा निषेध नोंदविला, त्यानंतर सावरकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे (वय ३५) व बळिराम डोळे (वय ३८) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धीरज घाटे (रा. साने गुरुजी वसाहत, सदाशिव पेठ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास युवक काँग्रेसचे सरचिटणीस असलेल्या सुरवसे व डोळे या दोघांनी सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्याच्या प्रवेशद्वाराला आक्षेपार्ह फलक लावला होता. त्याचवेळी त्यांनी त्यासंबंधीचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धीरज घाटे हे त्यांचे सहकाऱ्यांसमवेत सकाळी फिरण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी त्यांना सावरकर पुतळ्याच्या प्रवेशद्वाराला आक्षेपार्ह फलक लावल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ स्वारगेट पोलिसांना माहिती देत संबंधित फलक काढून टाकला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी करून निषेध नोंदविण्यास सुरुवात केली. घाटे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सुरवसे व डोळे यांना सायंकाळी ताब्यात घेतले. या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते व सावरकर प्रेमींनी सावरकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन आक्षेपार्ह फलक लावल्याप्रकरणी आंदोलन करीत निषेध नोंदविला. त्याचबरोबर त्यांनी सावरकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेकही घातला.

‘‘सावरकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात दोघांनी आक्षेपार्ह फलक लावला होता. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर दोघांना तत्काळ ताब्यात घेतले आहे. पुतळ्याच्या ठिकाणी दिवसभर बंदोबस्त ठेवला होता.’’
- अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे