ओरोफर इंजेक्शनची विक्री थांबविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओरोफर इंजेक्शनची विक्री थांबविली
ओरोफर इंजेक्शनची विक्री थांबविली

ओरोफर इंजेक्शनची विक्री थांबविली

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : रक्तातील लालपेशींची संख्या कमी झाल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या ओरोफर इंजेक्शनची तातडीने विक्री थांबविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी दिली. तसेच, या इंजेक्शनची एक बॅच बाजारातून परत मागविल्याची माहिती पुढे आली. या इंजेक्शनची गुणवत्ता तपासण्यासाठी याचे नमुनेही पुण्यातून घेतले आहेत.

ओरोफर इंजेक्शनच्या वापरानंतर मुंबईमध्ये एका रुग्णाची तक्रार ‘एफडीए’कडे आली. त्या आधारावर तातडीने या इंजेक्शनचा वापर थांबविण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत संबंधित कंपनीलाही तातडीने कळविण्यात आले. मात्र, या कंपनीची बाजू मिळाली नसल्यामुळे कंपनीचे नाव प्रसिद्ध केले नाही. तसेच या कंपनीतून जेथे-जेथे विक्री झाली होती, त्या सर्व ठिकाणी इंजेक्शनचा शोध घेण्यात आला. त्याचवेळी या इंजेक्शनची तातडीने विक्री थांबवावी, असा आदेश देण्यात आला. विशिष्ट बॅच क्रमांकाचे इंजेक्शन बाजारातून परत मागविल्याचेही ‘एफडीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

पुण्यात ज्या ठिकाणी या इंजेक्शनचा साठा होता, तेथून त्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले. ते आता गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित औषध निर्माण कंपनीची यापूर्वी बनावट इंजेक्शन बाजारात असल्याची तक्रार ‘एफडीए’कडे आली होती. पण, आता बाजारातून परत मागविलेल्या बॅच क्रमांकाशी तो जुळत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘ओरोफरचे संबंधित बॅच क्रमांकाचे इंजेक्शन विक्रीसाठी दुकानात असल्यास ते परत घाऊक औषध विक्रेत्यांकडे परत करावे, अशी सूचना ‘एफडीए‘ने दिली आहे. त्याप्रमाणे सर्व औषध विक्रेत्यांपर्यंत हा संदेश पोचविण्यात आला आहे.’’