पुणे नगर वाचन मंदिरात बालदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे नगर वाचन मंदिरात बालदिन साजरा
पुणे नगर वाचन मंदिरात बालदिन साजरा

पुणे नगर वाचन मंदिरात बालदिन साजरा

sakal_logo
By

पुणे नगर वाचन मंदिरात बालदिन साजरा
पुणे, ता. १९ ः बालदिनानिमित्त पुणे नगर वाचन मंदिरात नुकतेच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अप्पर इंदिरानगर वसाहतीत राहणारी ८ ते १० वर्षे वयोगटातील एकूण तेहेतीस मुले या कार्यक्रमासाठी निमंत्रित केली होती. कल्पेश समेळ आणि प्रतिक्षा खासनीस या ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांनी या मुलांपुढे ‘गोष्टींच्या गोष्टी’ असा नाट्य, नृत्य, गायन यांचा मिलाफ असलेला सुंदर कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमानंतर मुलांना अल्पोपहार देण्यात आला. प्राचीन ग्रंथालय पाहून मुले भारावून गेली होती. स्वाती ताडफळे यांनी मुलांना संस्थेची माहिती सांगितली. सुवर्णा जोगळेकर यांनी सर्व मुलांचे व निमंत्रितांचे आभार मानले.

पुणे मराठी ग्रंथालयात पुरस्कार वितरण
पुणे, ता. १९ ः पुणे मराठी ग्रंथालयात ना. ह. आपटे व ना. के. बेहेरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा तोडमल होत्या. या कार्यक्रमात नयना सहस्रबुध्दे यांना त्यांच्या ‘स्त्रीभान’ पुस्तकासाठी तर नितीन वैद्य यांना त्यांच्या ‘जवळिकीची सरोवरे’ या पुस्तकासाठी हे पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे, कार्याध्यक्ष श्रीकांत देव व कार्यवाह सुधीर इनामदार तसेच खासदार विनय सहस्त्रबुद्धे, लेखक रवींद्र गुर्जर आदी उपस्थित होते.

डॉ. प्रतिमा इंगोले यांना पुरस्कार जाहीर
पुणे, ता. १९ ः डॉ. प्रतिमा इंगोले यांना नागपूरच्या डॉ. गिरीश गांधी फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कादंबरी लेखनातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. इंगोले यांना मिळालेला हा एकशे दहावा पुरस्कार आहे. आत्तापर्यंत त्यांच्या ‘बुढाई’, ‘पार्टटाईम’, ‘आत्मघाताचे दशक’, ‘बोडखी’, ‘नक्षलग्रस्त’, ‘राशाटेक’ अशा सहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहे. या कादबऱ्यांसाठी त्यांना राज्य पुरस्कारांसह विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.