Ayurveda : जपानी विद्यार्थीपुण्यात गिरवताहेतआयुर्वेदाचे धडे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurveda
जपानी विद्यार्थी पुण्यात गिरवताहेत आयुर्वेदाचे धडे!

Ayurveda : जपानी विद्यार्थी पुण्यात गिरवताहेतआयुर्वेदाचे धडे!

पुणे : भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने धडे गिरविण्यासाठी जपानमधील ४० आयुर्वेदाचे विद्यार्थी पुण्यात एकत्र आले आहेत. गुरुकुल पद्धतीने हे विद्यार्थी आयुर्वेदाबरोबरच योगशास्त्र, पाकशास्त्र, संगितशास्त्र अशा विविध कला आणि क्रीडांचा अभ्यास करत आहेत. वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टमध्ये हा उपक्रम शुक्रवारपासून सुरू झाला. येत्या बुधवारपर्यंत (ता. २३) हा उपक्रम सुरू राहणार आहे. याचे औपचारिक उद्‍घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय आयुर्वेद गुरुकुल
आयुर्वेदासह भारतीय संस्कृती आणि शास्त्रांचा जगभर वेगाने प्रसार होत आहे. जागतिक योग दिन हा देखिल याच शृंखलेचा भाग असल्याचे दिसते. या पार्श्वभूमिवर भारतीय संस्कृतीमध्ये ‘गुरुकुल’ संकल्पनेला महत्त्व आहे. गुरुकुलमध्ये विद्यार्थी दिवस-रात्र गुरूच्या सानिद्यात राहून विविध शास्त्र अवगत करतात. या संकल्पनेवर आधारित ‘ग्लोबल वैदिक गुरुकुल’ हा उपक्रम पुण्यात राबविण्यात आला आहे. त्यात जपानमधील ४० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. देशातील अशा प्रकारचा पहिला आंतरराष्ट्रीय आयुर्वेद गुरुकुल असल्याची माहिती भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी दिली.

गुरुकुलमधील अध्ययन
गुरुकुलमध्ये वैद्य सदानंद सरदेशमुख हे शरीरातील विविध अवयवांचे आयुर्वेदोक्त विवेचन आणि आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांताची माहिती जपानमधील विद्यार्थ्यांना देत आहेत. हे विद्यार्थी सतत गुरूच्या सानिध्यात असतात. वनौषधींचे महत्त्व, त्यांची जोपासना, व्याधींवर कसा परिणाम करते हे बारकावे या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहेत.

भारतीय शास्त्रांची ओळख
आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र असले तरीही, माणसाने आजारी पडू नये, अशा जीवनशैलीवर हे शास्त्र भर देते. त्यामुळे त्यात व्यायाम, आहार, आचार, विचार अशा संस्कारांची ओळख जपानमधील विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे. पाककला, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम तसेच पारंपारिक नृत्यकला, क्रीडा, लोककला, मंगळागौरीचे खेळ, मल्लखांब, दांडपट्टा असे धाडसी क्रीडा प्रकार प्रात्यक्षिक दाखवून त्याचे भारतीय परंपरेतील महत्त्व विशद करण्यात येत असल्याचेही डॉ. सरदेशमुख यांनी स्पष्ट केले.

भारतीय आहार, पाकशास्त्र आणि आयुर्वेद याचा जवळचा संबंध आहे. आधुनिक काळात याचे महत्त्व प्रकर्षाने जगासमोर येत आहे. त्याची ओळख गुरुकुलच्या माध्यमातून जपानी विद्यार्थ्यांना होईल. आयुर्वेदाबरोबरच भारताच्या वैभवशाली परंपरेतील शास्त्र, कला याची ओळख करून देणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदाची दखल घेण्यात येत असल्याचे या प्राचीन वैद्यकशास्त्राचे महत्त्व जगाला आता पटत आहे.
- वैद्य सुकुमार सरदेशमुख

टॅग्स :studentJapanayurveda