महामार्गावर तातडीने उपाययोजना करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर तातडीने उपाययोजना करा
महामार्गावर तातडीने उपाययोजना करा

महामार्गावर तातडीने उपाययोजना करा

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः महामार्गावर नवले पुलाजवळ होत असलेले अपघात थांबलेच पाहिजेत. निविदा मागवू, प्रकल्प अहवाल तयार करू, मंजुरी घेऊ, अशी कारणे सांगू नका. त्यासाठी अल्पावधीत शक्य असलेल्या उपायांची तातडीने अंमलबजावणी करा, अशा शब्दांत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना सोमवारी धारेवर धरले. अपघात रोखण्याच्या उपायांचा आराखडा तयार करून त्याची आठ दिवसांत अंमलबजावणी करण्यासही त्यांनी बजावले.
या महामार्गावर रविवारी तीन गंभीर अपघात झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचा आदेश यंत्रणांना दिला. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयात सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे (एनएचआयए) प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक नियोजन शाखेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चालकाने डिझेल वाचविण्यासाठी उतारावर ट्रक बंद करून चालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे. ट्रकचालक फरार असून, तो सापडल्यानंतर खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आम्हाला नागरिकांचे जीव महत्त्वाचे आहेत. पूर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या सहा महिन्यांत येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा एकदा अपघातांची संख्या वाढत आहे. अपघात कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणांतील समन्वय वाढविणार आहोत.
अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

या होणार उपाययोजना
- जाड थराचे व कमी अंतर असणारे रम्बलर्स तयार करणे, त्याची सतत देखभाल दुरुस्ती करणे
- मुख्य उतार कमी करण्याबाबत उपाययोजना करणे
- पोलिसांची गस्त वाढविणार
- स्वामी नारायण मंदिर ते दरी पुलादरम्यानचा तीव्र उतार कमी करणार
- ठिकठिकाणी रिफ्लेक्‍टर बसविणे
- जडवाहनांचा वेग टप्प्याटप्प्याने कमी करणे
- सेवा रस्ता रुंदीकरण, दुरुस्ती व त्यावरील अतिक्रमणे काढणे
- या भागात वेग कमी करण्याबाबतची उद्‌घोषणा करणारी यंत्रणा बसविणे
- जडवाहनांची वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रतितासापर्यंत कमी करणे
- बोगद्यापासून ठिकठिकाणी स्पिड गन, सीसीटीव्ही बसविणे
- नऱ्हे सेवा रस्ता व महामार्गाला मिळणाऱ्या सर्व छोट्या रस्त्यांवर रम्बलर्स बसविणे
- रस्त्यावर पथदिवे बसविणे, सेल्फि पॉइट हटविणे
- महामार्गावरील फलक स्पष्ट दिसण्यासाठी उपाय