Pune Weather Update : पुण्यातील तापमानात किंचित वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update
पुण्यातील तापमानात किंचित वाढ

Pune Weather Update : पुण्यातील तापमानात किंचित वाढ

पुणे : तापमान गेल्या दोन दिवसांपासून १० अंशाच्या खाली गेले होते. त्यात आता पुन्हा काहीशी वाढ झाली आहे. असे असले तरी गारठ्याची अनुभूती मात्र कायम आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी शहरात ११.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सातत्याने घट झाल्यानंतर आता पारा पुन्हा चढू लागला आहे. परंतु गारठा असाच कायम राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल चार ते पाच अंशांनी घट झाली होती. त्यात कमाल तापमान ही ३० अंशांखाली नोंदले जात होते. परिणामी थंडीचा कडाका वाढला होता. दरम्यान, तापमानात आता हळू-हळू वाढ होत असून शहरातील किमान तापमान पुढील आठवडाभर ११ ते १३ अंशांच्या दरम्यान नोंदले जाऊ शकते. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्र गारठले होते. परंतु किमान तापमानात वाढ झाली असून तापमानात चढ-उतार अशीच पाहायला मिळणार आहे.

चुरू येथे सर्वांत नीचांकी तापमान
उत्तर भारतातील राज्यांमध्ये मात्र थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी तापमान राजस्थानच्या चुरू येथे नोंदले गेले. तर राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे ७.४ अंश सेल्सिअस इतकी झाली. नाशिक, जळगाव औरंगाबाद येथे पारा १० अंशांच्या खाली होता. सध्या राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी घट कायम आहे. तर बुधवारी (ता. २३) राज्यात थंड व कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून ते ठळक कमी दाब प्रणालीमध्ये रूपांतरित झाले असून ते निवळण्याची चिन्हे आहेत.

येथे पारा १० अंशांच्या खाली
औरंगाबाद ः १०
उस्मानाबाद ः ९.९
निफाड ः ७.४
नाशिक ः ९.५
जळगाव ः ९.२

बंगालच्या उपसागरात असलेल्या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यासह पुण्यात ही हळू-हळू बाष्प पुरवठा होत आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात ही किंचित वाढ होताना दिसून येत आहे.
- डॉ. अनुपम काश्‍यपी, हवामानशास्त्रज्ञ