बायकोने घडविले विश्‍वरूप दर्शन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बायकोने घडविले
विश्‍वरूप दर्शन...
बायकोने घडविले विश्‍वरूप दर्शन...

बायकोने घडविले विश्‍वरूप दर्शन...

sakal_logo
By

‘‘अहो, तुम्ही चपातीचे तुकडेच करूनच खाणार आहात ना? मग तुम्हाला कशाला हवीय गोल चपाती.?’’ स्वातीने धीरजला धारेवर धरले.
‘‘अगं चपाती करतेस की विविध देशांचा नकाशा काढत आहेस. एकतरी चपाती गोल कर की.’’ धीरजने म्हटले.
‘‘गोल चपात्या करणं मला अजिबात आवडत नाही. चपात्यांमध्ये व्हरायटी नको का? तेच तेच खाण्याचा कंटाळा येत नाही का? खाण्याबरोबर तुमचा भूगोलाचा अभ्यासही होतो. ही घ्या नेपाळच्या नकाशासारखी चपाती.’’ असे म्हणून स्वातीने एक चपाती त्याच्या ताटात वाढली.
‘‘आता अमेरिकेच्या नकाशासारखी चपाती करते.’’ असे म्हणून तिने दुसरी चपाती लाटायला घेतली.
‘‘लाटा, लाटा लाटा गं. अजून चपात्या लाटा गंऽऽऽ....’’ ‘आनंदी- गोपाळ’ चित्रपटामधील ‘वाटा वाटा वाटा गं.ऽऽऽ’ या गीताच्या चालीवर तिने गाणे म्हटले.
‘‘चपात्यांद्वारे तू मला जगाची सफर घडवत आहेस, ही चांगली गोष्ट आहे पण खरं सांगू का, माझी आई मऊ रेशमागत चपात्या करते. गोल कसा असतो, हे माझ्या आईने केलेल्या चपात्यावरून बाबांनी आम्हाला लहानपणी शिकवले होते. आईने शिकवल्यामुळे आमची ताईदेखील गोल चपात्या......’’ धीरजला मध्येच थांबवत स्वाती म्हणाली,
‘‘दोघींचं काही सांगू नका. सासूबाईंना काम सांगितलं की ‘माझे गुडघे दुखतात गं.’ ही कॅसेट सुरू होते आणि लेकीकडे गेल्या की आठ मजले दणादणा चढून जातील आणि धुण्या- भांड्यासह सगळी कामं करतील, त्यावेळी कोठे जाते गुडघेदुखी आणि ताईंना काही सांगावं तर ‘सासरी मला खूप काम पडतं म्हणून विश्रांतीसाठी माहेरी यावं, तर माझ्यावर कामाचा ढिगारा टाकला जातो.’ असं म्हणतात. या दोघींनी कधी गोल चपात्या केल्यात, हे काय माझ्या पाहण्यात आलं नाही.’’ स्वातीने रागाने म्हटले.
‘‘या दोघीही फार दिवस आपल्याकडे राहू नयेत म्हणून तू बेचव स्वयंपाक करतेस, याची मला कल्पना आहे.’’ धीरजने टोमणा मारला.
सासूबाई आणि ताईंनी मर्यादित जेवण करावं, असा माझा हेतू असतो. शिवाय मी बेचव स्वयंपाक करते म्हणून तुमचे वजन आटोक्यात आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर शंभर- सव्वाशे किलो तुमचे वजन झाले असते. तुमच्या तब्येतीची काळजी मलाच घ्यावी लागते.’’ स्वातीने पलटवार केला.
‘‘मित्रांना मी कितीवेळा जेवायला घरी बोलावले आहे पण ते येत नाहीत, याला तुझा स्वयंपाक कारणीभूत आहे.’’ धीरजने आणखी एक आरोप केला.
‘‘तुमचे मित्र घरी आले, की घराचा उकिरडा करतात. तुमची जीभही नियंत्रणात राहत नाही. म्हणून मला नाइलाजाने स्वयंपाक बिघडावा लागतो. तशी मी सुगरण आहे. मी केलेला स्वयंपाकाचे फोटो फेसबुकवर टाकले तर पाचशे- सहाशे लाईक आणि कमेंटस मिळतात.’’ स्वातीने म्हटले.
‘‘कमेंट करणाऱ्यांनी प्रत्यक्ष तुझ्या हातचं खाल्लं तर परत अशी डेअरिंग करणार नाहीत.’’ धीरजने म्हटलं. तेवढ्यात शेजारच्या सुमनवहिनी आल्या.
‘‘वहिनी, पिंटू घरी आहे का? काल तो मला श्रीलंका, भारत आणि पाकिस्तानचा नकाशा कसा असतो, हे विचारत होता. मी स्वातीला ही गोष्ट सांगितल्यावर तिने चपात्याद्वारे या देशांचे नकाशे बनवले आहेत. त्याला दाखवले असते.’’ असे म्हणून त्याने चपात्या दाखवल्या. थोड्यावेळाने वहिनी निघून गेल्यानंतर स्वातीने रणचंडिकेचा अवतार धारण केला. त्यामुळे तिच्यासमोर एकदम नमते घेत धीरज म्हणाला,
‘‘तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तू केलेल्या चपात्यांचं मी कौतुकच करतोय. खरं तर तुझ्या हाताची चव कोणाऽऽ कोणाला नाही. तू केलेल्या चपातीसारखी चपाती जगात कोठेही मिळत नाही. मला आता ऑस्ट्रेलियाच्या नकाशासारखी चपाती दे.’’ असं म्हणून धीरज वेगवेगळ्या देशांच्या नकाशांची फर्माईश करू लागला.