अतिक्रमणधारकांना ‘एनएचएआय’चा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणधारकांना ‘एनएचएआय’चा इशारा
अतिक्रमणधारकांना ‘एनएचएआय’चा इशारा

अतिक्रमणधारकांना ‘एनएचएआय’चा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील नवीन कात्रज बोगदा ते वारजेदरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये अतिक्रमण हे एक कारण आहे, असा निष्कर्ष राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) काढण्यात आला आहे. यापार्श्वभुमीवर संबंधितांनी त्वरित अतिक्रमण न काढल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणातर्फे देण्यात आला आहे.

या महामार्गावरील अपघातांबाबत विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांची २१ नोव्हेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत ठरल्यानुसार सेवा रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत आणि दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यालगतच्या मिळकतधारकांनी केलेले अतिक्रमण आणि विनापरवाना बांधकाम स्वखर्चाने त्वरित काढून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन कात्रज बोगदा ते वारजेदरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवरील सेवा वाहिन्या (पाणी पुरवठा, टेलिफोन, विद्युत वाहिनी, ओएफसी केबल्स) संबंधित यंत्रणेने त्वरित स्वखर्चाने काढून घ्याव्यात. अतिक्रमण काढताना काही नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
----------
संबंधित अतिक्रमणधारकांनी दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमण काढावे. प्राधिकरणाच्यावतीनेही अतिक्रमण काढण्यात येत असून, त्याचा खर्च आणि दंड संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येणार आहे.
- एस. एस. कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय
-----