गैरप्रकारांचा महा‘मार्ग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गैरप्रकारांचा महा‘मार्ग’
गैरप्रकारांचा महा‘मार्ग’

गैरप्रकारांचा महा‘मार्ग’

sakal_logo
By

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ ः मुंबई-बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने उशीरा का होईना अतिक्रमणांवर कारवाईस सुरूवात केली आहे. मात्र, कात्रज चौक ते कात्रज घाट आणि कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंट‌, बार, लॉजचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंग, चारचाकी वाहने व पानटपऱ्यांचे सेवा रस्त्यांवरील वाढलेले अतिक्रमण, मद्यपींचा वाढता वावर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या परिसरात वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढत आहेत.


महामार्गावर स्टंटबाजी
संबंधित हॉटेल्स, बार, लॉजमध्ये येणारे ग्राहक मद्यपान करून रस्त्यावरच धिंगाणा घालतात. त्यातून शिवीगाळ, भांडणे होतात. महामार्गालगतच्या अनेक बार, लॉजच्या परिसरात गैरप्रकार वाढले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून ये-जा करणारी वाहने तेथेच थांबतात. रात्रीच्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण मद्यपान करून महामार्गावर स्टंटबाजी करतात. त्यातून अपघात होतात.


महामार्गावर काय परिणाम होतो?
१) हॉटेल्स, लॉज, बार, रेस्टॉरंट‌मध्ये येणारे ग्राहक सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करतात.
२) अनेकदा दोन ते तीन लेनमध्ये वाहने बेकायदा लावली जातात.
३) अनेक हॉटेल्स, लॉज, बारचे पार्किंग तसेच, त्यांच्या पानटपऱ्या, छोटी दुकाने, पत्र्याचे शेड, ओटाही थेट सेवा रस्त्यावर आहे.
४) या रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांना सेवा रस्ता पुरेशा प्रमाणात वापरण्यास मिळत नाही.
५) परिणामी बहुतांश नागरिक थेट महामार्गावरूनच दुचाकी, चारचाकी वाहने पुढे नेतात.
६) या प्रकाराबाबत आवाज उठविणाऱ्यांवर दादागिरी केली जात असल्याच्या तक्रारी.


हॉटेल्स, लॉज, बारच्या बाहेरील सेवा रस्त्यावर रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केले जाते. संबंधितांना जाब विचारल्यास आम्हाला धमकाविले जाते. त्यामुळे आम्हाला नाइलाजास्तव सेवा रस्त्याऐवजी महामार्गावरून घरी जावे लागते. महापालिका, पोलिस यांच्याकडून संबंधितांवर कुठलीही कारवाई होत नाही.
- विनोद कचरे, स्थानिक नागरिक

नऱ्हे, धायरी, कात्रज, आंबेगाव, वारजे परिसर
- कुठे वाढले शहरीकरण

हॉटेल्स, लॉज, बार, रेस्टॉरंटची संख्या वाढली
- काय परिणाम झाला


२० ते २५
हॉटेल्स

२० ते २५
लॉज

१० ते १२
बार
नवले पूल ते कात्रज नवीन बोगदा परिसर


२५ ते ३०
हॉटेल्स

५ ते ६
बार

८ ते १०
लॉज
कात्रज चौक ते कात्रज घाट परिसर


महापालिका, पोलिसांचे दुर्लक्ष !
महामार्गालगत हॉटेल्स, बार, लॉजची संख्या वाढली असून अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाने तर गैरप्रकार घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबतची माहिती व सूचना आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.