अधिसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिसभा
अधिसभा

अधिसभा

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित विद्यापीठ विकास मंचाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीतच १० पैकी आठ जागांवर मंचातर्फे निवडणूक लढविलेले उमेदवार निवडून आले.
निवडणुकीतील १० जागांपैकी आठ जागांचे निकाल रात्री साडेअकरा वाजेपर्यंत जाहीर करण्यात आले. उर्वरित दोन जागांवरील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. १० जागांपैकी पाच जागा या खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी होत्या. त्यातील तीन जागांचे निकाल जाहीर झाले, तर याच प्रवर्गातील दोन जागांचे निकालासाठी मतमोजणी सुरू होती.


यंदा राजकीय पक्षांनी उघडपणे पॅनेल करून उमेदवार अधिसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळे सुरवातीपासूनच निवडणुकीला राजकीय स्वरूप मिळाले होते. भाजपशी संबंधित आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या गटातील उमेदवारांचे ‘विद्यापीठ विकास मंच’ हे पॅनल होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल, आदी पक्ष-संघटनांचे एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते.
विद्यापीठ विकास मंचातर्फे अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातून गणपत नांगरे हे १३ हजार ९९५ मतांनी, भटक्या जमाती (एन.टी) प्रवर्गातून विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी, अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातून राहुल पाखरे हे १३ हजार ५१२ मतांनी, तर इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून सचिन गोर्डे हे १३ हजार ३४२ मतांनी विजयी झाले. महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर या १५ हजार ६४९ अशा सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. खुल्या प्रवर्गात विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस हे पहिल्या फेरीतच खुल्या प्रवर्गातून चार हजार ४४७ मते मिळवून निवडून आले. तसेच खुल्या प्रवर्गातून सागर वैद्य हे तीन हजार ७११ मते मिळवीत पहिल्या फेरीत, तर युवराज नरवडे हे तीन हजार ६८६ मते मिळवत दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीत विद्यापीठ विकास मंचाचे सात उमेदवार निवडून आले. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उर्वरित उमेदवारांच्या निकालासाठी पुढील फेरी सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

निवडून आलेले उमेदवार
१) नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ
विजयी उमेदवार (प्रवर्ग) : मिळालेली एकूण मते
- प्रसेनजीत फडणवीस (खुला) : ४,४४७
- सागर वैद्य (खुला) : ३,७११
- युवराज नरवडे (खुला) : ३,६८६
.... (खुला) : ...
..... (खुला) : ...
- राहुल पाखरे (एससी) : १३,५१२
- गणपत नांगरे (एसटी) : १३,९९५
- विजय सोनवणे (एनटी) : १४,१०१
- सचिन गोर्डे (ओबीसी) : १३,३४२
- बागेश्री मंठाळकर (महिला) : १५,६४९