उदयोन्मुख कलाकारांसह दिग्गजांच्या सादरीकरणाची पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदयोन्मुख कलाकारांसह दिग्गजांच्या सादरीकरणाची पर्वणी
उदयोन्मुख कलाकारांसह दिग्गजांच्या सादरीकरणाची पर्वणी

उदयोन्मुख कलाकारांसह दिग्गजांच्या सादरीकरणाची पर्वणी

sakal_logo
By

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ः यंदाच्या महोत्सवातील कलाकारांच्या नावांची घोषणा
पुणे, ता. २३ ः ‘महोत्सवांचा मुकुटमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या यंदाच्या म्हणजेच ६८ व्या महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावाची घोषणा बुधवारी झाली. दिग्गज आणि उदयोन्मुख कलाकारांचा सुयोग्य मिलाफ, पं. भीससेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या किराणा घराण्याच्या गायकांचा विशेष सहभाग आणि परदेशात स्थायिक झालेल्या; परंतु भारतीय संगीत कलेचा वारसा चालवणाऱ्या कलाकारांचे सादरीकरण, हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, प्रभाकर देशपांडे आणि पृथ्वी एडीफिसचे अभय केले उपस्थित होते. १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात हा महोत्सव रंगणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

जोशी म्हणाले, ‘‘कोरोनामुळे महोत्सवात पं. भीमसेन जोशी यांची साजरी करता न आल्याने यंदाच्या महोत्सवात ती साजरी करण्यात येणार आहे. महोत्सवाशी दीर्घकाळ संबंधित असलेले, मात्र नजीकच्या काळात स्वर्गवासी झालेल्या कलाकारांचे कुटुंबीय आणि शिष्यांना महोत्सवात सहभागी करून घेत मंडळ त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहे. पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने महोत्सवाला प्रारंभ होईल, तर समारोप स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होणार आहे. गायक अविनाश कुमार, सरोदवादक उस्ताद आलम खाँ, गायिका मनाली बोस, यशस्वी सरपोतदार, ‘श्रीवल्ली’फेम गायक सिड श्रीराम, ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना आणि गायक संदीप नारायण हे कलाकार यंदा पहिल्यांदाच महोत्सवात सादरीकरण करणार आहेत.’’

महोत्सवाचे वेळापत्रक ः
पहिला दिवस ः १४ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १०
- पं. उपेंद्र भट (गायन)
- शाश्वती मंडल (गायन)
- पं. रतनमोहन शर्मा (गायन)
- उस्ताद अमजद अली खाँ (सरोदवादन)

दुसरा दिवस ः १५ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १०
- अविनाश कुमार (गायन)
- उस्ताद आलम खाँ (सरोदवादन)
- पं. साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा (सहगायन)
- डॉ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी शंकर, नंदिनी शंकर (व्हायोलिनवादन)

तिसरा दिवस ः १६ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १०
- मनाली बोस (गायन)
- राहुल शर्मा (संतूरवादन)
- श्रीनिवास जोशी (गायन)
- पं. अजय चक्रवर्ती (गायन)

चौथा दिवस ः १७ डिसेंबर - दुपारी ३ ते रात्री १२ (परवानगी मिळाल्यास)
- यशस्वी सरपोतदार (गायन)
- उमाकांत गुंदेचा व अनंत गुंदेचा (धृपदगायन)
- भारती प्रताप (गायन)
- विराज जोशी (गायन)
- सिड श्रीराम (कर्नाटक शैलीतील गायन)
- उस्ताद रशीद खाँ व उस्ताद शाहीद परवेज (गायन-सतार जुगलबंदी)

पाचवा दिवस ः १८ डिसेंबर - दुपारी १२ ते रात्री १०
- आनंद भाटे (गायन)
- राजेंद्र प्रसन्ना (बासरीवादन)
- राजेंद्र कंदलगावकर (गायन)
- महेश काळे व संदीप नारायण (हिंदुस्थानी-कर्नाटक संगीत गायन जुगलबंदी)
- अर्चना जोगळेकर (कथक नृत्य)
- डॉ. प्रभा अत्रे (गायन)

फोटो PNE22T06935