समाविष्ट २३ गावांसाठी १५००कोटींचा प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाविष्ट २३ गावांसाठी १५००कोटींचा प्रकल्प
समाविष्ट २३ गावांसाठी १५००कोटींचा प्रकल्प

समाविष्ट २३ गावांसाठी १५००कोटींचा प्रकल्प

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः महापालिकेने समाविष्ट २३ गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या, पावसाळी गटारे टाकण्यासाठी तब्बल १५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी (जायका) सोबत चर्चा सुरू आहे.

राज्य सरकारने जुलै २०२१ मध्ये शहराच्या हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट केली. या गावात रस्ते, पाणी, कचरा, मलःनिसारण, पावसाळी गटारे, पथ दिवे यासह अनेक समस्या आहेत. या असुविधा दूर कराव्यात यासाठी आंदोलनेही केली जात आहेत. यापार्श्वभुमीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

पूर्वी समाविष्ट केलेल्या ११ गावांत मलवाहिन्या टाकण्यासह तीन मैलाशुद्धीकरण केंद्रही उभारले जाणार आहेत. त्याच पद्धतीने आता २३ गावांत काम सुरू केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. समाविष्ट गावांत सात मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधणे, मलवाहिन्या टाकणे यासाठी ११०० कोटी रुपयांचा खर्चाचा अंदाज दिला आहे. तसेच पावसाळी गटारे करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो, असे अहवालात नमूद केले आहे.


‘‘तेवीस गावांतील मैलापाण्याची व्यवस्था करणे आणि पावसाळी गटारांची सुविधा निर्माण करणे यासाठी सल्लागाराने प्राथमिक अहवाल दिला आहे. यासाठी १५०० कोटींचा खर्च येऊ शकतो. अंतिम अहवाल आल्यानंतर पूर्वगणनपत्रक तयार केले जाईल.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका