मिळकतींच्या मोजणीसाठी ईटीएस-रोव्हर-ड्रोन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकतींच्या मोजणीसाठी ईटीएस-रोव्हर-ड्रोन!
मिळकतींच्या मोजणीसाठी ईटीएस-रोव्हर-ड्रोन!

मिळकतींच्या मोजणीसाठी ईटीएस-रोव्हर-ड्रोन!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २ : ईटीएस मशिन आणि रोव्हरच्या तंत्रज्ञानाबरोबरच प्रथमच ड्रोन तंत्रज्ञनाचा वापर करून खराडी येथील मिळकतींची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आठ चौरस किलोमीटर असलेल्या खराडीतील प्रत्येक मिळकतींना आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच तंत्रज्ञानाचा एकत्रितरित्या वापर केल्यानंतर मोजणीचा कालवधी, त्यातील अचूकता यांचा अभ्यास करून भविष्यात महापालिकेच्या हद्दीतील सर्वच गावांची मोजणीचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे.

वडगाव शेरीत प्रयोग
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, परंतु अशा शहरात मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्हीही सुरू आहेत. अथवा, सिटी सर्व्हे झाले असून देखील सातबारा उतारा सुरू आहे. त्यामुळे अशा शहरात जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या वापर करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरी या गावामध्ये जीएआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नुकताच एक प्रकल्प राबविण्यात आला. त्यामध्ये रोव्हर आणि ईटीस मशिनचा वापर करून अवघ्या ३५ दिवसांमध्ये या गावाची मोजणी पूर्ण करण्याचा नवा विक्रम भूमी अभिलेख विभागाने केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता खराडी गावची मोजणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या मान्यतेने भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे; यंदा मात्र रोव्हर, ईटीस मशिन आणि ड्रोन अशा तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे, अशी माहिती विभागाचे पुणे प्रदेशचे संचालक किशोर तवरेज यांनी सांगितले.

प्रॉपर्टी कार्डचा फायदा काय?
प्रॉपर्टी कार्ड हे महसूल विषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हितसंबंध जोपासले जाणार आहे. प्रॉपर्टी कार्डवर इमारतीखालील सर्व क्षेत्र, तसेच प्रत्येक सदनिकाधारकाचे वैयक्तिक मालकीच्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद असणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकाचा जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. तसेच सदनिकेची खरेदी विक्री करताना उद्भवणारे वाद मिटणार आहे. एकाच सदनिका वेगवेगळ्या बॅंकेकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलून फसवणूक करण्याच्या प्रकाराला देखील आळा बसणार आहे.

सध्या काय आणि पुढे काय होणार?
- खराडी गावठाण हद्दीत प्रॉपर्टी कार्ड
- तर काही भागात सातबारा उतारा
- मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर सातबारा उतारा बंद होणार
- सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार

महापालिकेचा काय फायदा?
- महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची हद्द निश्‍चित होणार
- रस्त्यांची क्षेत्र, लांबी, रुंदी यांची माहिती मिळणार
- मिळकतींची संख्या निश्‍चित होणार
- मिळकत कराच्या माध्यमातून महसूल वाढण्यास मदत होणार
- सरकारी जमिनींची माहिती जमा होणार

उंच इमारतींमुळे अनेकदा रोव्हरचा वापर करण्यास मर्यादा येतात. त्यामुळे ज्या भागात उंच इमारती आहेत, अशा भागात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. तर काही भागात रोव्हर आणि ईटीएस मशिनचा वापर करून मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या दोन्हीतील अचूकता तपासण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठी तफावत नसेल, तर भविष्यात या तंत्रज्ञानाच्या या पद्धतीचा वापर करून महापालिकेच्या हद्दीतील गावांची मोजणी गतीने पूर्ण करणे शक्य होणार आहे.

- किशोर तवरेज, संचालक, पुणे प्रदेश भूमी अभिलेख विभाग