Municipal Election : लोकसंख्या कमी, मतदारसंख्या अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Election
लोकसंख्या कमी, मतदारसंख्या अधिक

Municipal Election : लोकसंख्या कमी, मतदारसंख्या अधिक

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरून प्रभागरचना निश्‍चित करण्यात येणार असली तरी मतदारसंख्या ही २०२२ ची ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक प्रभागात लोकसंख्या कमी आणि मतदारसंख्या जास्त, अशी परिस्थिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना करताना मतदार याद्या कशा फोडायच्या, असा प्रश्‍न महापालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

पुण्यासह राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच प्रभाग रचना तयार करताना २०११ ची जनगणना ग्राह्य धरण्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या एक सदस्यीय पद्धतीने २००७ मध्ये निवडणूका झाल्या होत्या. त्यासाठी २००१ ची जनगणना ग्राह्य धरून वॉर्ड रचना करण्यात आली होती. त्यानंतर २०११ मध्ये केंद्र सरकारकडून नव्याने जनगणना करण्यात आली. २००१ आणि २०११ च्या जनगणनेचा तुलनात्मक अभ्यास प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर जुन्या पुण्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त होणार असल्याचे यापूर्वी केलेल्या प्रभाग रचनेत समोर आले होते.

राज्य सरकारकडून निवडणुकांबाबत निर्णयात होणाऱ्या वारंवार बदलामुळे २०२३ मध्ये होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघातील मतदारसंख्या तसेच राज्य निवडणूक आयोग जी तारीख निश्‍चित करून देईल, तो कट ऑफ डेटची मतदार संख्या विचारात घेऊन याद्या फोडून त्यानंतर प्रभाग रचना तयार करावी लागणार आहे. त्यामुळे ही तफावत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

जनगणना न झाल्यामुळे मध्यंतरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कायद्यात बदल करीत सदस्य संख्येत वाढ केली. तो बदल बेकायदा असल्याचे कारण पुढे करीत शिंदे सरकारकडून तो रद्द करण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा २०११ ची जनगणना ग्राह्य धरून महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना करावी लागणार आहे. महापालिका निवडणुका नवीन वर्षात होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणूकीसाठी मतदारसंख्या ग्राह्य धरताना जानेवारी महिन्यातील मतदार संख्या ग्राह्य धरावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना करताना मतदार याद्या कशा फोडाव्यात, असा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. कारण १२ वर्षांपूर्वीच लोकसंख्या विचारात घेतली, तर अनेक प्रभागात मतदारसंख्या ही लोकसंख्यापेक्षा जास्त असणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जनगणना वेळेत न झाल्यामुळे त्याचा फटका जसा शासकीय योजनांना बसला आहे, तसाच तो महापालिका निवडणुकांना देखील बसणार असल्याचे, या निमित्ताने समोर आले आहे.

तीन सदस्यांचा एक प्रभाग

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भाने निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाकडून नव्याने प्रभाग रचना तयार करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली. निवडणूक आयोगाने व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार याद्यांच्या विषयावर

चर्चा झाली. मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. त्या दुरुस्त करण्याबरोबरच अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नव्याने प्रभागरचनेबाबतचे आदेश जरी प्रशासनाला प्राप्त झाले असले, तरी प्रभाग रचनेचा कार्यक्रम अद्याप आयोगाकडून न आल्याने प्रशासन देखील संभ्रम अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. ही रचना करताना २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे.